इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरातील सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्ती विसर्जन शहापूर खणीत की पंचगंगा नदीपात्रात यावरून वाद पेटला असताना मंगळवारी पर्यावरण मंत्री दिपक केसरकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी गणेशमुर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीपात्रातच करावे लागेल, अशी ठाम भूमिका मांडल्यामुळे मंत्री केसरकर यांनी बैठक आटोपती घेत सन्मानजनक तोडगा काढू, असे आश्वासन दिले. त्यामुळे इचलकरंजीतील गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगा नदीत की शहापूर खणीत, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणावरून सध्या वाद तेवत आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील गणेशमूर्ती विसर्जनावर तोडगा काढण्यासाठी प्रकाश आवाडे यांनी बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी पर्यावरण मंत्री केसरकर यांनी प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आवाडे यांनी शहापूर खणीतील घाण पाणी आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवून पंचगंगा नदीपात्रातच मूर्ती विसर्जन झाले पाहिजे. दहा दिवस विधीवत पूजाअर्चा करायची आणि आणि ज्यांना देव म्हणतो त्या मुर्तीचे विसर्जन गटारगंगेत करायचे हे कोणत्या धर्माच्या नियमात बसते, असा संतप्त सवाल करीत आक्रमक भूमिका मांडली.
इचलकरंजीकरांसाठी वेगळे नियम का लावता असा सवाल उपस्थित करीत शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी आम्ही आमच्या देवदेवतांचे पंचगंगेच्या निर्मळ पाण्यातच विसर्जन करणार, असे ठणकावून सांगितले. परंतु हे करीत असताना पंचगंगेच्या पाण्याचे प्रदूषण होणार नाही याचीही दक्षताही आम्ही घेवू अशी भूमिका माने यांनी मांडली. पंचगंगा प्रदूषण करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. राज्य शासनाने एक धार्मिक भावना म्हणून याकडे पहावे आणि पंचगंगा नदीपात्रात गणेशमुर्ती विसर्जनाची परवानगी द्यावी, अशी आग्रही भूमिका माने यांनी मांडली.
त्यानंतर मंत्री केसरकर यांनी सन्मानजनक तोडगा काढू आणि गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जातील, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असे सांगितले. बैठकीस पर्यावरण विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पोलीस उपअधीक्षक बी.बी.महामुनी, अॅड.समीर मुदगल, शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी मंगेश मस्कर, नागेश पाटील तसेच अविनाश कांबळे, शैलेश गोरे आदी उपस्थित होते.