शिरढोण : इचलकरंजी शहराला वरदान ठरलेल्या कृष्णा नळ पाणी योजना कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडे या गावासाठी अभिशाप बनत चालली आहे. गेल्या चार महिन्यापासून येथील बाणदार शाळेजवळ खोत यांच्या घरासमोर वारंवार पाईपलाईनला मोठी गळती लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून इचलकरंजीचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या गळती काढण्याचे काम जरी युद्ध पातळीवर सुरू असले तरी अजून दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प राहील असे ठेकेदारचे म्हणणे आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या नागरिकांना पाण्यासाठी व शिरढोण व टाकवडेतील लोकांना वाहतुकीसाठी मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी माळ भागातील मुजावरांच्या घराजवळ मोठी गळती लागली होती त्यामुळे राहत्या सहा घरांच्या भिंती पूर्णतः ओलावल्या होत्या. त्यामुळे येथे राहणारी भाडेकरूही घर सोडून गेली आहेत. शिवाय मुख्य रस्त्यावरही गळतीमुळे मोठं मोठे खड्डे पडले होते. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तरीही नगरपालिकेचे अधिकारी बघूया, करूया अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या पाणी योजनेच्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर आहे. वारंवार गळती लागते. पालिकेचे दुर्लक्ष होते. त्रास भोगताहेत कुरुंदवाड, शिरढोण टाकवडेचे ग्रामस्थ हे चित्र कायम आहे. गळतीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकांच्या तोडणीवर परिणाम होत आहे. मुख्य रस्त्यासह शेतामध्ये पाणी जात असल्यामुळे ऊसतोडणी करणे अवघड झाले आहे. तसेच ऊस वाहतुकीसाठी खर्चिक पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वारंवार सांगूनही संबधीत अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप येथील वसाहतीचे लोक करत आहेत. ही गळती काढण्यासाठी इचलकरंजीचे पाणी चार दिवस बंद करू काय असा उलट सवाल हे अधिकारी करत असल्याचे नागरिक म्हणत आहेत. तसेच गेले चार महिने तुम्हांला ही गळती सापडत नाही अशी कोणत्या प्रकारची गळती आहे काय असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांतून होत आहे. केवळ याठिकाणी तक्रार आली की उकरून ठेवायचे आणि लिकेज सापडले नाही म्हणून पुन्हा ते खड्डे बुजवायचे हा प्रकार काय आहे अशी विचारणा होत आहे. पाणी उपसापासून ते योजनेच्या ठिकाणा पर्यंत एकदा हा गळतीचा विषय तपासून बघा अन्यथा या तिन्ही गावातून या योजनेला तीव्र विरोध करण्यात येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
वर्षनुवर्षं या योजनेच्या पाईपलाईनला कुठे ना कुठे गळती लागतेच. गळती काढण्यासाठी करण्यात येणारा खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडत आहे.याचा हिशोब कोण मागणार हे गुलदस्त्यात आहे. गळती काही निघत नाही नुसता गाळ उपसला जातो.