इचलकरंजी : भाडेकरूला घरातून काढण्याच्या वादातून घरात घुसून राजेशकुमार देवकिशन जोशी यांच्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करून त्यांचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपी संदीप दत्तात्रय कांबळे (रा. इचलकरंजी) याला जिल्हा व सत्र न्यायालय १ चे न्यायमूर्ती एल. डी. बिले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणातील प्रदीप दत्तात्रय कांबळे, महेश मारुती कांबळे, प्रिया संदीप कांबळे, प्रमिला प्रदीप कांबळे, अर्चना महेश कांबळे, बाळाबाई दत्तात्रय कांबळे, शोभा सुनील कांबळे व जयश्री पांडुरंग कांबळे या आठ आरोपींना प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, अशी शिक्षाही ठोठावली.
महात्मा फुले चौक परिसरातील एका इमारतीत २ जानेवारी २०२३ रोजी रात्री ही घटना घडली होती. राजेशकुमार जोशी यांच्या भाडेकरूंचे वर्तन योग्य नसल्याचे सांगत संदीप कांबळे व त्याच्या साथीदारांनी त्या भाडेकरूंना रात्रीच घराबाहेर काढण्याचा तगादा लावला होता. या वादातून संदीप कांबळे याने मार्बल फरशीने जोशी यांच्या डोक्यात वार केला तर इतरांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गावभाग पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तत्कालीन सपोनि आबा गाढवे, पो. कॉ. विशाल जाधव यांनी तपास केला. फिर्यादी संतोषदेवी जोशी, वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार सानप आदींच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. एच. एन. मोहिते-पाटील यांचाही युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा सुनावली.