इचलकरंजी : इचलकरंजीचा पहिला महापौर कोण होणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर हा निर्णय होत नसल्याने बुधवारच्या मिरज येथे बैठकीत महापौर निवडीबाबत चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पहिला महापौर आवाडे की हाळवणकर गटाचा, याबाबतही उलटसुलट चर्चा शहरात सुरू होती; तर बैठकीत हाळवणकर गटाकडून प्रदीप धुत्रे, तानाजी पोवार तर आवाडे गटाकडून उदय धातुंडे, राजू बोंद्रे, नितेश पोवार यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते.
महापौरपदाच्या नावावरून नाराजीनाट्य होऊ नये, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवार, दि. 6 रोजी महापौराच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्याच दिवशी अर्ज दाखल होणार आहे. महापौरपदासाठी अनुभवी की तरुण चेहरा याबाबतही तर्कवितर्क लढवले जात होते. आ.राहुल आवाडे यांची तरुण चेहर्याला पसंती असल्याचे संकेत मिळत होते. त्यामुळे तरुण चेहर्याला पहिला महापौर होण्याची संधी मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर आवाडे व हाळवणकर गटाकडून नवीन चेहर्याने महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. मात्र, स्थानिक पातळीवर एका नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने महापौर निवडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्याचे ठरले.
शहरवासीयांचे लक्ष
बुधवारी मिरज येथे मंत्री चंद्रकांत पाटील, आ.आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी आ.प्रकाश आवाडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांची बैठक पार पडली. यामध्ये इच्छुकांसह तरुण चेहर्याच्या नावाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत महापौरपदाचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात असले तरी त्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार असल्याचे समजते. या घोषणेनंतरच अर्ज दाखल होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी महापौरपदासाठी कुणाचे नाव जाहीर होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.