इचलकरंजी : जल्लोष साजरा करीत असताना धक्का लागल्याच्या कारणातून आणि पूर्ववैमनस्यातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत वाद सोडवण्यासाठी गेलेले हेडकॉन्स्टेबल सद्दाम हुसेन सनदी यांच्यासह साहिल प्रदीप देठे, आनंदा लक्ष्मण साठे, बादल परिस दौडमणी (सर्व रा. इचलकरंजी) हे जखमी झाले. येथील स्टेशन रोड परिसरात सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती पो. नि. शिवाजी गायकवाड यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळा परिसरात सोमवारी रात्री 12 नंतर अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी जमले होते. यावेळी काहीजण जल्लोष करीत होते. गर्दीमधील एकमेकांना धक्का लागल्याने तसेच पूर्ववैमनस्यातून खंजिरे इस्टेट रस्त्यावर धक्काबुक्की सुरू झाली. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामुळे गोंधळाची आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी असलेले कॉन्स्टेबल सद्दाम सनदी वाद सोडवण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी दगडफेक झाली.
त्यामध्ये कृष्णा श्रावण कटारे, अमोल श्रावण कटारे, सिद्धार्थ नागेश विधाते, सूरज नागेश विधाते, ओंकार विधाते आदींसह अन्य अनोळखी पाच ते सहा संशयितांनी केलेल्या दगडफेकीत सनदी जखमी झाले. संशयितांनी साहिल देठे, आनंदा साठे, बादल दोडमणी यांनाही दगडाने मारहाण केली. जमाव ऐकत नसल्याने जादा पोलिस बंदोबस्त मागवून जमाव पांगवण्यात आला. जखमी सनदी यांच्यावर इंदिरा गांधी इस्पितळात उपचार सुरू आहेत. मारहाणप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली आहे. उपनिरीक्षक प्रदीप जाधव तपास करीत आहेत.