इचलकरंजी : येथील लालनगर येथे सुरू असलेल्या खोदाईच्या कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. 
कोल्हापूर

Ichalkaranji road issue | इचलकरंजीतील 12 कोटींचा ‘आयडॉल रस्ता’ खड्ड्यांतच?

उद्घाटन दोनदा, काम मात्र संथच; पावसात रस्त्याची दयनीय अवस्था

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते निरामय हॉस्पिटलमार्गे सांगली रस्ता हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. ‘आयडॉल रस्ता’ म्हणून विकसित करण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सिमेंट काँक्रीटचा दर्जेदार रस्ता उभारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला लागलेली संथगती आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मुख्यमंत्री तसेच इतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते दोनवेळा उद्घाटन होऊनही कामात अपेक्षित वेग दिसत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावर विविध कामांसाठी सतत खोदाई सुरूच आहे. ड्रेनेजलाईन, गॅस पाईपलाईन तसेच जलवाहिन्यांमधील गळती दुरुस्त करणे या कामांसाठी वारंवार रस्ता उकरण्यात आला. ही कामे अद्याप पूर्णत्वास न गेल्याने अनेक ठिकाणी खड्डे तसेच उघडी चरच राहिली आहेत. त्यामुळे रस्त्याखाली सतत पाणी झिरपत राहते आणि भराव वारंवार खचत असल्याने रस्त्याचा पाया कमकुवत होत आहे.

अलीकडील पावसामुळे या उखडलेल्या रस्त्याची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. त्यामुळे हा मार्ग अक्षरशः पाणंद रस्त्यासारखा बनला आहे. या मार्गावर रुग्णालये, शाळा, हॉटेल्स, बाजारपेठ तसेच उद्यान असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. खराब रस्त्यामुळे वाहनांची गती मंदावते, वाहतूक कोंडी निर्माण होते. या रस्त्याच्या कामात विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. एक विभाग काम पूर्ण करण्याआधीच दुसर्‍या विभागाकडून पुन्हा खोदकाम केले जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नियोजनाअभावी एकाच रस्त्यावर वारंवार कामे सुरू राहिल्याने प्रकल्प लांबणीवर पडत आहे.

सध्या मुख्य पावसाळ्यातच रस्त्याचे काम सुरू ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, अशा परिस्थितीत कामाच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. ‘आयडॉल रस्ता’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार की केवळ कागदावरच राहणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT