Ichalkaranji Fraud Case | इचलकरंजीच्या व्यापार्‍याची 2.36 कोटींची फसवणूक 
कोल्हापूर

Ichalkaranji Fraud Case | इचलकरंजीच्या व्यापार्‍याची 2.36 कोटींची फसवणूक

चौघांवर गुन्हा; राजस्थानमधील एकास अटक

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील कापड व्यापार्‍याची दोन कोटी 36 लाख 68 हजार 306 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अनिरुद्ध सरजूप्रसाद गर्ग, अमरचंद गर्ग, सरजूप्रसाद गर्ग, रितिक अमरचंद गर्ग (सर्व रा. बालोतरा, राजस्थान) या चौघांवर गुन्हा दाखल केला. याची फिर्याद हिरेनकुमार बाबुलाल चोपडा (रा.आवाडेनगर) यांनी दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सूरजप्रसाद गर्गला पोलिसांनी अटक केली आहे.

हिरेनकुमार चोपडा हे माताजी टेक्स्टाईल्स नावाने राजस्थानातील पाली, मारवाड, बालोतरा, जोधपूर येथील व्यापार्‍यांना कापड विक्री करतात. 2023 मध्ये राजस्थानमध्ये अनिरुद्ध, सरजूप्रसाद व अमरचंद गर्ग हे तिघेजण संपर्कात आले. त्यांनी माघानी जेठाजी टेक्सोफाईन प्रा.लि., रामाकृष्ण मिल्स या फर्मद्वारे बासणी (जोधपूर राजस्थान) या ठिकाणाहून ग्रे, पॉपलीन कापडावर डाईंग प्रक्रिया करून त्याची विक्री करीत असल्याचे सांगून चोपडा यांचा विश्वास संपादन केला व उधारीवर माल घेतला. चोपडा यांनी 1 एप्रिल ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत 2 कोटी 63 लाख 65 हजारांचा माल पाठवला. याची रक्कम मागितली असता अनिरुद्ध याने सोशल मीडियावर बँकेचा 1.25 कोटींचा भरलेला धनादेश, आरटीजीएसचा फोटो पाठवला. पैसे देणार असल्याचे आमिष दाखवत पुन्हा त्यांनी कापड मागितले.

चोपडा यांनी पुन्हा विश्वास ठेवत 26 लाख 27 हजारांचा माल पाठवला. खात्यात पैसे जमा न झाल्याने चोपडा यांनी चौकशी केली असता गर्ग याने 9 लाख रुपये आरटीजीएस केले. पुन्हा पैशांसाठी तगादा लावला असता गर्ग याने 10 लाख रुपये आरटीजीएस करून तसेच 26 लाख 27 हजार 525 रुपयांचा कापड माल परत दिला. उर्वरित 2 कोटी 36 लाख 68 हजार 306 रुपयांसाठी तगादा लावला असता गर्ग याने शिवीगाळ व दमदाटी केली. कापड माल नातेवाईकांकडे ठेवल्याचा संशय तसेच काही कापड कंपनीला विक्री केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. सरजूप्रसाद गर्ग यास न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याची माहिती पो.नि. शिवाजी गायकवाड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT