गडहिंग्लज : दारू पिऊन पत्नीला प्लास्टिक पाईपने मारहाण करीत असताना पती-पत्नीच्या झटापटीत पत्नीने पतीच्या गळ्यावर सुरी मारल्याने रमेश रावसाहेब मोरे (वय 40, रा. लिंगनूर कसबा नूल, ता. गडहिंग्लज) याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी ही घटना घडली. याप्रकरणी प्रणिता रमेश मोरे (वय 35) हिला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
सहायक पोलिस निरीक्षक पवार यांच्यासह पथक घटनास्थळी गेले तेव्हा रमेश हा स्वयंपाक घरात निपचित पडला होता. तेथे रक्ताचे डाग होते व सुरीही होती. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पत्नी प्रणिताला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. रमेशला दारूचे व्यसन होते. काम न करता घरातूनच दारूसाठी पैसे घेऊन जायचा व दारू पिऊन सातत्याने भांडणे करून प्रणिताला मारहाण करीत होता.
गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास रमेश हा दारू पिऊन आला. प्रणिताला त्याने मारहाण करीत शिवीगाळ केली. दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. यामध्ये प्रणिताच्या हाती सुरी लागली. यातूनच रमेशच्या गळ्यावर झटापटीत वार झाल्याचे प्रणिताने पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नातेवाईक, शेजारी यांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट दिली.