कोल्हापूर : शंभर कोटींच्या निधीतून केलेल्या रस्त्यांपैकी यादवनगर येथे दोन ठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना अपघाताचा धोका आहे. Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur Road issue : पहिल्याच पावसात खड्ड्यांनी भरले शंभर कोटींचे रस्ते

डांबराचा थरच गेला वाहून; खडी आली बाहेर : अपूर्ण गटारांमुळे साचलेले पाणी रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शंभर कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरात करण्यात आलेल्या काही रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डे पडले असून, काही ठिकाणी डांबराचा थर उखडून खडी उचकटली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अपूर्ण गटारांमुळेही पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे.

महापालिकेने शहरातील खराब रस्त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. डिसेंबर 2023 मध्ये या प्रस्तावास मंजुरी देऊन 100 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून 16 रस्त्यांचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार अनेक रस्त्यांवर काम झाले असले, तरी अनेक ठिकाणी अजून अंतिम डांबरीकरणाचे काम बाकी आहे.

यादवनगरमध्ये अपघाताचे संकट

यादवनगर भागात माऊली पुतळा ते हुतात्मा पार्क रस्त्यावरील अवघ्या 100 मीटर अंतरावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. एका ठिकाणी रस्त्याची पृष्ठभागच खचल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मोठा धोका निर्माण झाला आहे. अपघातांची शक्यता वाढली असून वाहनचालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

महाद्वार रोडचे निकृष्ट काम

महाद्वार रोडवर केवळ पंधरा दिवसांपूर्वी खडी टाकून काम केले होते. मात्र, गटारांअभावी पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खडी उचकटली असून, हा रस्ता पूर्णतः खराब होण्याचे संकेत मिळत आहेत. अद्याप अंतिम डांबरीकरण झाले नसल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे.

गटारे बंद, पाण्याचा निचरा नाही

अनेक रस्त्यांखालील गटारे बुजलेली असल्यामुळे पावसाचे पाणी साचून राहते. यामुळे केवळ रस्ता खराब होतोय असे नाही, तर नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गटारे उघडून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला, तरच हे रस्ते टिकू शकतील, असे जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT