कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराच्या मुद्द्यावर अधिसभेत प्रचंड गोंधळ झाला. सदस्यांनी कडाडून विरोध करीत सूर्य, चंद्र व तारे असेपर्यंत ‘शिवाजी विद्यापीठ’च नाव राहणार, अशी आक्रमक भूमिका घेतली. नामविस्तारास विरोध म्हणून सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करीत निषेधाची फलके भिरकावली. प्रशासन व सदस्य यांच्यात सुमारे एक तास चाललेल्या खडाजंगीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. शेवटी अॅड. अभिषेक मिठारी यांनी मांडलेला नामविस्तार विरोधातील स्थगन प्रस्ताव कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी चर्चेविना स्वीकारला.
शिवाजी विद्यापीठ अधिसभा शनिवारी सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू सभागृहात झाली. सभेच्या सुरुवातीलाच अभिषेक मिठारी यांनी नामविस्ताराला विरोध करणारा स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर चर्चा करण्यास सभेचे अध्यक्ष तथा कुलगुरू यांनी नकार दिला. यावेळी आक्रमक झालेल्या सदस्यांनी दडपशाही चालणार नाही, माध्यम प्रतिनिधींना बाहेर घालवू शकत नाही, असे सांगत प्रश्नांची सरबत्ती करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही सदस्य खुर्चीवरून खाली बसले. विद्यापीठाचे नाव बदलण्याची विशिष्ट संघटनांकडून वारंवार मागणी केली जाते. याच सभागृहाने यापूर्वीही ही मागणी फेटाळून लावली आहे. आताही काही संघटनांनी अशी मागणी केली असून विद्यापीठाचे नाव बदलणार नाही, अशी भूमिका सभागृहाने घ्यावी, तसा ठराव करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाचे नाव बदलण्याचा वारंवार होत असलेला प्रयत्न कायमस्वरूपी थांबला पाहिजे, अशी भावना सदस्यांनी सभागृहासमोर व्यक्त केली.
यावर कुलगुरू डॉ शिर्के यांनी नामविस्ताराचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. हा विषय संवेदनशील आहे, त्यामुळे चुकीचा शब्द कुणाच्या तोंडून जाण्यापेक्षा या स्थगन प्रस्तावावर चर्चा नको असा सावध पवित्रा घेतला. सदस्यांच्या भावनांची कदर करीत योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्या भावना संबंधित यंत्रणेपर्यंत आठ दिवसात पोहचवू, असे आश्वासन कुलगुरुंनी सभागृहास दिले. मात्र, सदस्यांचे यावर समाधान झाले नाही. हा प्रस्ताव स्वीकारला असून विद्यापीठाचा नामविस्तार होणार नाही हे रेकॉर्डवर घ्या, तसे प्रोसेडिंग घेऊन ठराव करा यावर काही सदस्य अडून बसले. याप्रसंगी सद्यस्यांनी नामविस्ताराची मागणी करणार्यांचा धिक्कार असो, शिवद्रोहींचा धिक्कार असो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. यावेळी निषेधाचे फलक सभागृहात भिरकावून देण्यात आले. शेवटी कुलगुरू डॉ शिर्के यांनी हा स्थगन प्रस्ताव चर्चेविना स्वीकारल्याचे जाहीर केल्यानंतर सभागृहाची पुढील कामकाज सुरू होऊन वादावर पडदा पडला. सदस्य व्ही. एम. पाटील, डॉ. रघुनाथ ढमकले, श्वेता परूळेकर, डॉ. प्रकाश कुंभार, निवास गायकवाड, प्रताप पाटील यांनी नामविस्तारावर सभागृहात भूमिका मांडली.