विकास कांबळे
कोल्हापूर : ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा असलेल्या दूध व्यवसायात आता ‘मुरा’ जातीच्या म्हशींनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. अवघ्या चार वर्षांपूर्वी 70 ते 75 हजारांना मिळणारी मुरा म्हैस आता सव्वा ते दीड लाखांवर पोहोचली असून, अक्षरशः ‘लाखमोलाची’ झाली आहे. दुधाळ जनावरांमध्ये सर्वाधिक दूध देण्याची क्षमता आणि येथील वातावरणाशी जुळवून घेण्याच्या गुणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांकडून मुरा म्हशीला प्रचंड मागणी वाढली आहे.
पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून पाहिल्या जाणार्या दूध व्यवसायाला आता मुख्य व्यवसायाचे स्वरूप आले आहे. दूध संघांच्या विविध योजना, म्हैस खरेदीसाठी मिळणारे शासकीय अनुदान आणि दुधाला मिळणारा चांगला दर यांमुळे शेतकरी या व्यवसायाकडे अधिक गांभीर्याने पाहू लागले आहेत. पूर्वी महाराष्ट्रामध्ये पंढरपुरी, नागपुरी, खिल्लारी किंवा एलिचपुरी, वर्हाडी या जातींच्या म्हशी प्रसिद्ध होत्या. मात्र, त्यांची जागा आता हरियाणा आणि पंजाब राज्यांत उगम पावलेल्या मुरा म्हशी घेऊ लागल्या आहेत. मुरा म्हशीच्या वाढत्या मागणीमागे तिची उच्च दूध उत्पादन क्षमता हे प्रमुख कारण आहे. जिथे पंढरपुरी किंवा खिल्लारी म्हैस दिवसाला सरासरी 4 ते 7 लिटर दूध देते, तिथे मुरा म्हैस तब्बल 10 ते 16 लिटर दूध देते. याशिवाय, मुरा म्हैस वर्षानुवर्षे आपल्या दूध क्षमतेत सातत्य राखते. तिचा प्रजनन काळ तुलनेने लहान असून, ती दरवर्षी वेत देते, ज्यामुळे शेतकर्याला नियमित उत्पन्न मिळते. सुरुवातीला परराज्यातील ही जात आपल्या हवामानात टिकेल का, अशी शंका होती; पण आता तिने महाराष्ट्रातील हवामानाशी उत्तम प्रकारे जुळवून घेतले आहे.
शेतकर्यांमध्ये खरेदीसाठी वाढलेली स्पर्धा, त्यातून वाढत जाणारी मागणी आणि दूध उत्पादनातील शाश्वती तसेच दुधाला मिळणारा चांगला दर यामुळे मुरा म्हैस ही शेतकर्यांसाठी नफा देणारे पशुधन ठरते आहे. पुढील काही वर्षांमध्ये मुरा म्हशींची मागणी आणि दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
उच्च दर्जाचे जादा दूध मुरा म्हैस वर्षानुवर्षे उत्पादन क्षमतेत सातत्य ठेवते.
‘मुरा’चे मूळ हरियाणा, पंजाब असले तरी ती आता महाराष्ट्रातील हवामानाशी जुळवून घेते. मुरा म्हशीचा प्रजनन काळ तुलनेने लहान असून, दरवर्षी ती वासरू देण्यास सक्षम असते.