कोल्हापूर : देशात गर्भाशय मुखाचा आणि स्तनाचा कर्करोग यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, यावर मात करण्यासाठी व्यापक मोहीम राबवणे आवश्यक आहे, याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुलींना येत्या वर्षभरात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला (सर्व्हायकल कॅन्सर) रोखणारी प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली. तसेच जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि हेरिटेज कोल्हापूरतर्फे महावीर कॉलेजमधील आचार्य हॉलमध्ये आयोजित सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, अनेक महिला लाजाळूपणामुळे आजार अंगावर काढतात आणि वेळेवर उपचार घेत नाहीत, ज्यामुळे भविष्यात त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी ‘एचपीव्ही’ ही लस अत्यंत प्रभावी असल्याचे तज्ज्ञांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
जगात दर आठ मिनिटाला एका व्यक्तीचा कर्करोगाने मृत्यू होत आहे. कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महिलांना ही लस मोफत देण्याचा आमचा संकल्प आहे, असे ते म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर, हेरिटेज कोल्हापूरच्या चेअरमन अर्चना चौगले यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. इब्राहीम अन्सारी, डॉ. रूपा नागावकर, स्वरूपा कालेकर, प्राजक्ता कलमकर, रीना भोले उपस्थित होते. आभार बी. आर. माळी यांनी मानले.
मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी लवकरच शेंडा पार्क येथे निवासी फिजिओथेरपी केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाहीदेखील मंत्री मुश्रीफ यांनी दिली.