कोल्हापूर : शहरासह नागाळा पार्कातील लोकवस्तीत बिबट्या आलाच कसा? त्याचा एन्ट्री पॉईंट शोधण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचे पोलिस आधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गजबजलेल्या नागाळा पार्क, विवेकानंद महाविद्यालय परिसरात अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने सर्वांचीच धांदल उडाली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पथक दोन मिनिटांत दाखल झाले, असे स्पष्ट करून पोलिस अधीक्षक म्हणाले, परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही सुरक्षितता महत्त्वाची होती. जिल्हाधिकारी अमोल येडगेही तिथे उपस्थित होते. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. नागरिकांंना सुरक्षितस्थळी हटविणे गरजेचे होते.
बिबट्या कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, ही शक्यता गृहीत धरून पोलिस दलासह वन खात्याची यंंत्रणा चोखपणे नियोजन करीत होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून पोलिस अंमलदार कृष्णा पाटील यांच्यासह तिघेजण बचावले. सर्वांच्या सहयोगातून तीन तासांच्या थरारनाट्यानंतर बिबट्याला पकडण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यवर्ती आणि गजबजलेल्या परिसरात बिबट्या आलाच कसा, हा प्रश्न आहे. बिबट्याने कोणत्या मार्गाने शहरात प्रवेश केला, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बिबट्याचा एक दिवस अगोदर परिसरात वावर असल्याची चर्चा आहे. त्याचीही माहिती घेत आहोत. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. अजूनही काही फुटेज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र यंत्रणेमार्फत त्याचा शोध घेण्यात येत आहे.- योगेशकुमार गुप्ता, पोलिस अधीक्षक