Kodoli murder case | कोडोलीत हॉटेल व्यावसायिकाचा खून 
कोल्हापूर

Kodoli murder case | कोडोलीत हॉटेल व्यावसायिकाचा खून

पैशाच्या वादातून घटना : लोखंडी गजाने डोक्यात वार; संशयित फरार

पुढारी वृत्तसेवा

कोडोली : पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे व्याजाच्या पैशावरून झालेल्या वादातून अभिजित प्रकाश जाधव (वय 42, रा. शिक्षक अपार्टमेंट, कोडोली) या हॉटेल व्यावसायिकाचा संदीप पाटील (रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, सध्या रा. पेपरमील जवळ कोडोली, ता. पन्हाळा) याने डोक्यात लोखंडी गज मारून खून केला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील पारकर कापड दुकानासमोर ही घटना घडली.

अभिजित जाधव यांनी आपल्या हॉटेल व्यवसायासाठी संदीप पाटील याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशांच्या देवाणघेवाणीवरून रविवारी दुपारी तीन वाजता दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र, रागाच्या भरात संदीपने चार वाजता अभिजितला पुन्हा बोलवून घेतले. यावेळी संतप्त झालेल्या संदीपने लोखंडी गज अभिजितच्या डोक्यात घातला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिजितला रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मित्र जयदीप पाटील याने दुचाकीवरून कोडोली पोलिस ठाण्यात नेले. तक्रार नोंदवत असतानाच अभिजितला चक्कर येऊ लागल्याने पोलिसांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र शिवाजी पुलाजवळ पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

घटनेनंतर आरोपी संदीप पाटील फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोडोलीतील पारकर कापड दुकानासमोर पोलिसांनी रात्रभर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

परिसरात तणाव, नातेवाईकांचा आक्रोश

अभिजितच्या निधनाची बातमी समजताच सीपीआर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता. अभिजितच्या पत्नीने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. अभिजितच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT