कोल्हापूर ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर राज्यातील प्लेगच्या साथीत होमिओपॅथिक औषधांचा वापर करीत अनेकांचे जीव वाचवले. डॉ. धोडोपंत बोरकर यांना राजाश्रय देऊन 1898 मध्ये कोल्हापुरात होमिओपॅथीचा दवाखाना सुरू करीत देशात प्रथम सार्वजनिक आरोग्यसेवेत होमिओपॅथीचा समावेश केला. हा दवाखाना भारतातील पहिला सार्वजनिक होमिओपॅथी दवाखाना असून महाराष्ट्रात होमिओपॅथी उपचार पदतीला ‘अच्छे दिन’ आले आहेत.
उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या जर्मनी येथील डॉ. सॅम्युएल हानिमन यांनी लिपझीक शहरी वैद्यकीय व्यवसाय करत असताना 1790 मध्ये होमिओपॅथी औषध प्रणालीचा शोध लावला. 1776 मध्ये प्रत्यक्ष होमिओपॅथी औषध प्रणाली रुग्णांच्या सेवेत आली. 19 व्या शतकात वैद्यकीय क्षेत्रात या उपचार पद्धतीला मानाचे स्थान प्राप्त झाले. आज जगात या पद्धतीला ‘अच्छे दिन’ प्राप्त झाले आहेत. राज्यात होमिओपॅथीचे खासगी 65, तर 1 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून येथून वर्षा एमडीचे 360, तर बी.एच.एम.एस.चे 4,200 असे एकूण 4 हजार 558 डॉक्टर शिक्षण घेऊन बाहेर पडतात. राज्यात खासगी 90 हजार पॅक्ट्रिशनर्स डॉक्टर कार्यरत आहेत.
1898 मध्ये करवीर राज्यात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. प्लेगची साथ आटोक्यात येत नव्हती, तेव्हा होमिओपॅथीमध्ये प्लेगवर इलाज असल्याची माहिती शाहू महाराजांना मिळाल्याने त्यांनी होमिओपॅथी औषधांचा वापर केला. होमिओपॅथी औषधांचा वापर सुरू झाल्यानंतर मृत्युदराचे प्रमाण कमी झाले. होमिओपॅथीचे ज्ञान संपादित केलेल्या शाहू महाराजांचे खासगी डॉक्टर धोडोपंत बोरकर यांनी प्लेग साथीमध्ये होमिओपॅथी औषधोपचार केले.
कोल्हापुरात प्रथम होमिओपॅथिक दवाखाना जुना राजवाड्यातील इमारतीत शाहू छत्रपतींच्या पणजी महाराणी अहिल्याबाई यांच्या नावाने स्थापन झाला. नंतर तो वरुणतीर्थ वेस, त्यानंतर भाऊसिंगजी रोडवरील पूर्वी कोतवालची ‘चावडी’ जागेत आणला. शाहू महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी रुग्णालयाचे नामांतर ‘श्रीमंत शाहू छत्रपती होमिओपॅथिक दवाखाना’ असे केले. 1928 मध्ये राजाराम महाराजांनी होमिओपॅथिक दवाखान्याचा उपयोग चांगला होत असून तो मध्यवस्तीतच राहावा तसेच दुसरीकडे नेऊ नये, असा ठराव केल्याची (148 जनरल खाते ठराव क्र 66) नोंद आहे. आज याच होमिओपॅथीला कोल्हापुरातच नव्हे, तर भारतात ‘अच्छे दिन’ आले आहेत. कोरोना काळात ही उपचारपद्धती प्रभावी ठरली होती.
शेर-ए-पंजाब म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या रणजित सिंह यांनी 1836 मध्ये होमिओपॅथी पद्धती सर्वप्रथम भारतात आणली. डॉ. होनिंगबर्ग या जर्मन होमिओपॅथीज्ज्ञास राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय देऊन भारतात होमिओपॅथीचा प्रवेश घडवून आणला अन् पहिला दवाखानाही स्थापन केला. त्यावेळी करवीरमधील प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यास हाच दवाखाना तारणहार ठरला.
होमिओपॅथी उपचार पद्धतीवर रुग्णांचा विश्वास वाढत आहे. दिवसेंदिवस या उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कलही वाढला आहे. जगातील दुसर्या क्रमांकाची ही औषध प्रणाली आहे. राज्यात शासकीय होमिओपॅथी रुग्णालयांची संख्या वाढवण्याची गरज आहे.डॉ. राजकुमार पाटील, अधिष्ठाता, होमिओपॅथी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक