कोल्हापूर : हॉकी स्टेडियम परिसरात मित्रानेच सिद्धू बनवी या मजुराचा गळा आवळण्यासाठी वापरलेली केबल पोलिसांनी जप्त केली. बनवी याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी मनीष जालिंदर राऊत (वय 28, रा. राऊत कॉलनी, कळंबा, रिंगरोड) याला अटक केली आहे. दरम्यान, जप्त केलेली केबल फॉरेन्सिक लॅबकडे आणि मृताच्या अंगावरील कपडे व रक्ताचे नमुने पोलिसांनी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीष राऊत आणि सिद्धू बनवी हे दोघे सोमवारी रात्री जेवण्यासाठी एकत्र गेले होते. दारू सेवनानंतर व्हिनस कॉर्नर परिसरातील हॉटेलमध्ये जेवताना ‘आईवरून’ शिवी दिल्याचा राग मनीषला आल्याने त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात मनीषने सिद्धूला मारहाण केली. नंतर दोघे मनीषच्या दुचाकीवरून घरी निघाले; मात्र यल्लम्मा मंदिर चौकात दुचाकी बंद पडल्याचे सांगून मनीषने सिद्धूला खाली उतरवले आणि त्याच वेळी वायरीने गळा आवळून त्याचा खून केला.
दरम्यान, सिद्धू बनवी हा गोकाक तालुक्यातील चिकनंदी येथे दोन महिन्यांपासून काम करत होता. तिथून निघताना त्याने मालकाकडून 30 हजार रुपये घेतले होते. मात्र घटनास्थळी ही रक्कम किंवा त्याचा मोबाईल कुठेही आढळला नाही. संशयित मनीषने मोबाईल व पैशांबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.