कोल्हापूर : ‘जय भवानी, जय शिवराय’चा जयघोष... डीजेचा ताल... नयनरम्य आतषबाजी.. अशा उत्साही चैतन्यमयी वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापूरच्या प्रश्नांवर प्रहार करणारे फलक, 14 फुटी अश्वारूढ छत्रपतीचा पुतळा, दहा फूट उंचीचा जिरे टोप, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ व मावळे यांची वेशभूषा केलेल्या शिवभक्तांनी लक्ष वेधले.
वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वज व शिवप्रतिमेचे पूजन झाले. महिलांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास मिरजकर तिकटी चौकात आ. राजेश क्षीरसागर, माजी आ. मालोजीराजे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे नेते विजय देवणे, अशोक पोवार, बाबा पार्टे, जयसिंग शिदे, चंद्रकांत भोसले संदीप चौगुले, निवास शिंदे, सदानंद सुर्वे आदी प्रमुख उपस्थित होते.
गदाधारी जय हनुमान व 14 फुटी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि विठ्ठल रखुमाई प्रतिमा होती. अश्वारूढ राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सईबाई राणीसाहेब आणि मावळे आदींनी लक्ष वेधले. पारंपरिक लेझीम, हलगीच्या तालावर शिवभक्तांनी ठेका धरला होता. ‘स्वराज्यात धर्मवाद, जातिवाद नव्हता’, ‘जातिभेद गाडा भारत देश जोडा असा संदेश देणारे सर्व जाती-धर्मांचे स्वराज्याचे शिलेदार होते’ असे फलक चित्ररथावर होते.
केशवराव भोसले नाट्यगृह जळले की जाळले? पोलीस तपासाचे काय झाले. राजश्री शाहूंची वारसास्थळे नष्ट करण्याचा घाट घातला आहे काय?, राज्यकर्त्यांनी तीर्थक्षेत्र आराखड्याचे काय झाले, आई अंबाबाईला फसवू नका, असे रिक्षावर लावलेले कोल्हापूरच्या ज्वलंत प्रश्नांना प्रहार करणारे फलक लक्ष वेधून घेत होते. त्यामध्ये प्रामुख्याने हद्द वाढ करायची नाही, तर कोल्हापूरची नगरपालिका करा, शहरी आणि ग्रामीण अशी भांडणे लावू नका. कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार काय, असे फलक मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.