कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळ इमारतीच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक लुक

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनस इमारतीच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक लुक दिला जाणार आहे. किल्ला आणि राजवाड्याचा समावेश असलेल्या डिझाईनला मंजुरी दिल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळाच्या टर्मिनस इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑक्टोबरपर्यंत ही इमारत वापरासाठी खुली करण्याचा विचार आहे. तत्पूर्वी इमारतीचे प्रवेशद्वार कोल्हापूरच्या समृद्ध आणि वैभवशाली इतिहासाची साक्ष देईल, असे करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार इमारतीच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक लुक दिला जाणार आहे. या प्रवेशद्वारासाठी मराठा साम—ाज्यातील ऐतिहासिक स्थळे, गडकोट यांच्यासाठी वापरण्यात आलेला दगडच वापरण्यात येणार आहे. यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री शिंदे यांनी डिझाईनला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रवेशद्वाराचे काम केले जाणार आहे. त्याकरिता निविदा काढून तत्काळ कामही सुरू केले जाणार आहे. हे काम दीड-दोन महिन्यांत पूर्ण होईल, असेही नियोजन करण्यात येत आहे.

दगड राखून ठेवले : जिल्हाधिकारी

विमानतळ इमारत प्रवेशद्वाराला ऐतिहासिक लुक देण्यासाठी केलेल्या डिझाईननुसार आवश्यक दगड निश्चित केला आहे. या कामासाठी तो राखूनही ठेवला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT