सतीश सरीकर
कोल्हापूर : वाढत्या प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या ऐतिहासिक रंकाळ्याला आता ‘काऊनॉमिक्स (आयुर्वेदिक) तंत्रज्ञाना’द्वारे पुनरुज्जीवन दिले जाणार आहे. ‘अमृत योजना टप्पा-२’अंतर्गत त्यासाठी १२ कोटी निधी मंजूर झाला असून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रासायनिक घटकांविना, पूर्णपणे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने हे शुद्धीकरण होणार असल्याने तलावातील जलचरांचे रक्षण करत रंकाळा पुन्हा एकदा स्वच्छ आणि निळाशार दिसणार आहे. दरम्यान, टाकाळा तलावालाही याच पद्धतीने पुनरुज्जीवन दिले जाणार आहे. लवकरच रंकाळा व टाकाळा संवर्धनाचे काम सुरू होणार आहे.
दुहेरी फायदा आणि संवर्धनाला गती
या आयुर्वेदिक प्रक्रियेमुळे पाण्यातील दुर्गंधी नाहीशी होईल, जैविक कचरा व शेवाळ विघटित होईल आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. सांडव्याची स्वच्छता आणि गाळ नियोजनासह ही ट्रीटमेंट सुरू झाल्यावर रंकाळ्याचा श्वास मोकळा होईल.
रंकाळ्यातील संपूर्ण पाणी उपसा करणे अशक्य आहे. तसेच, रासायनिक औषधांचा वापर केल्यास मासे व इतर जलचरांचा जीव जाण्याची भीती असते. काऊनॉमिक्स टेक्नॉलॉजी हे वैदिक विज्ञान आणि निसर्गावर आधारित एक पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर करून डबके, तलाव व पाण्याचे साठे कोणत्याही रासायनिक किंवा यंत्रसामग्रीशिवाय नैसर्गिकरीत्या शुद्ध आणि पुनरुज्जीवित केले जातात.
गेल्या काही दशकांत रंकाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आणि उपनगरे वाढली. शाम सोसायटी नाल्यातून १२ ते १४ लाख लिटर, देशमुख हॉल नाल्यातून ४ ते ५ लाख लिटर, सरनाईक नाल्यातून ६ ते ७ लाख लिटर आणि परताळा नाल्यातून ५ ते ६ लाख लिटर सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत होते. राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत २००६ मध्ये ९ कोटी रुपयांचा निधी मिळवून हे पाणी दुधाळी नाल्याकडे वळवण्यात आले खरे; परंतु अद्यापही पावसाळ्यात व इतरवेळी हे नाले ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर सांडपाणी रंकाळ्यातच मिसळते. परिणामी, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. तलावावर शेवाळाचा हिरवा थर साचल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले होते.