कोल्हापूर

कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसराच्या इतिहासाने अवघे भारावले

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवपूर्वकाळात रंकाळा परिसरात झालेली लढाई, देश स्वातंत्र्यलढ्यात रंकाळा परिसरात क्रांतिकारकांनी केलेल्या सशस्त्र कारवाया, यासह विविध सामाजिक घटनांचा साक्षीदार असणार्‍या आणि आधुनिक युगात कोल्हापूरच्या पर्यटन क्षेत्राचा मानबिंदू असणार्‍या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या इत्यंभूत माहितीने अवघे भारावले.

निमित्त होतं दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनतर्फे जागतिक वारसा दिनानिमित्त (18 एप्रिल) आयोजित 'हेरिटेज वॉक' उपक्रमाचे. रंकाळा तलाव परिसरातून ही वारसा फेरी काढण्यात आली. यात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेज, संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजी पेठ, नागोजीराव पाटणकर हायस्कूलमधील विद्यार्थी, शिक्षक आणि एनसीसी-एनएसएसच्या छात्रांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मंगळवारी सकाळी झालेल्या या हेरिटेज वॉकमध्ये वास्तूविशारद अजित जाधव व शिवशाहीर राजू राऊत यांनी मार्गदर्शन केले.
अजित जाधव म्हणाले, कोल्हापूरच्या रंकाळा तलावास प्राचीन, धार्मिक व ऐतिहासिक तसेच जैवविविधतेचा परिपूर्ण वारसा आहे. छत्रपती शिवाजी चौथे यांच्या काळात 1877 मध्ये रंकाळा तलावाच्या बांधकामास सुरुवात होऊन ते 1883 ला पूर्ण झाले. प्रथम तलावाचे खोदकाम झाल्यानंतर दगडी तटबंदी बांधण्यात आली. यासाठी 2 लाख 52 हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती राजघाटावरील कोनशिलेवर आहे.
धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक महत्त्व असणारा रंकाळा तलाव रंकतीर्थ, पक्षीतीर्थ, शौर्यतीर्थ अशा विविध नावांनी ओळखला जात असल्याची माहिती शाहीर राजू राऊत यांनी दिली. रंकाळा तलावाचे जल प्रदूषण रोखण्यासाठी पुढील काळात धुण्याची चावी या वास्तूची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले.

उपक्रमात कॉमर्स कॉलेजचे प्रा. डॉ. रविकुमार नाईक, प्रा. डॉ. एस. एफ. बोथीकर, प्रा. एस. एस. बेनाडे, नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. पुजारी, के. एम. साखरे, एन. एस. पाटील, के. यू. जाधव, संजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहा कदम, सिद्धार्थ कुराडे, अंजली नेवरेकर, शुभम कुरणे, मुकुल पोरे, सरदार पोवार आदींनी सहभाग घेतला. उपक्रमास कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांचे सहकार्य लाभले.

पराक्रमाची पहिली खूण…

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या पराक्रमाची पहिली खूण म्हणूनही रंकाळ्याकडे पाहिले जाते. आदिलशहा आणि निजामशहा यांच्यातील संघर्षाच्या काळात आदिलशहाविरुद्ध निंबाळकरांनी मोहीम हाती घेतली. रंकाळ्याजवळ निंबाळकरांची छावणी होती. या छावणीवर आदिलशाही सैन्याने हल्ला केला. त्यावेळी मालोजी आणि विठोजी भोसले या दोघांनी हा हल्ला परतवून लावला आणि आदिलशाही सैन्याला पराभूत केले. या दोघांच्या पराक्रमावर खूश होत निजामशहाने या बंधूंना पुणे, सुपे, चाकण परिसराची जहागिरी बहाल केली. या युद्धानंतरच्या निजामशाही फर्मानातच मालोजी भोसले यांना 'राजा' ही पदवी दिली आणि शिवनेरी किल्लाही दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT