कोल्हापूर : दक्षिणायन किरणोत्सव कालावधीतील तीन दिवसांत मावळतीच्या किरणांनी पहिल्या दिवशी अंबाबाईला चरणस्पर्श केला, दुसऱ्या दिवशी खांद्यापर्यंत तर तिसऱ्या दिवशी (गुरुवारी) कटीमध्यापर्यंत स्पर्श केला. किरणोत्सव सोहळ्यादरम्यान किरणांचा हा प्रवास आणि उजळलेला अंबाबाईचा गाभारा.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Ambabai Temple Kirnotsav | सूर्यकिरणे अंबाबाईच्या कटीमध्यापर्यंत

किरणोत्सवाची सांगता; देवीच्या मुखापर्यंत न पोहोचल्याने सोहळा अपूर्ण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक दक्षिणायन किरणोत्सवाची बुधवारी सांगता झाली. मावळतीच्या सूर्याची सोनेरी किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या मूर्तीपर्यंत पोहोचली. मात्र सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या चरणांपासून पुढे सरकत कमरेपर्यंत पोहोचला. देवीच्या मुखापर्यंत सूर्यकिरणांचा स्पर्श होऊ शकला नाही. त्यामुळे किरणोत्सवाचा सोहळा पूर्णत्वास न गेल्याने भाविकांमध्ये निराशा पाहायला मिळाली.

दक्षिणायन काळातील मुख्य किरणोत्सव सोहळ्यास ९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी चरणस्पर्श, दुसऱ्या दिवशी कमरेच्यावर किरणे पोहोचल्याने अखेरच्या दिवशी गुरुवारी मावळतीची किरणे अंबाबाईच्या मुखावर पडतील आणि किरणोत्सव सोहळा पूर्ण होईल अशी अपेक्षा भाविकांमध्ये होती. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच किरणोत्सव अनुभवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पर्यटकांमध्येही उत्सुकता होती. मावळतीच्या सूर्यकिरणांचा मंदिराच्या दिशेने सुरू झालेला प्रवास प्रत्येक टप्प्यावर भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास किरणांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या विविध वास्तूंचे टप्पे पार करत किरणांनी गाभाऱ्याच्या दिशेने वाटचाल केली.

सायंकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी गरुड मंडपमधून किरणांचा प्रवेश झाला. पुढे ५ वाजून २३ मिनिटांनी गणपती मंदिरामागे तर ५ वाजून २९ मिनिटांनी कासव चौकात ६२३ लक्स तीव्रतेने किरणे आली. ५ वाजून ३५ मिनिटांनी पितळी उंबरठ्याला स्पर्श केला. ५ वाजून ३८ मिनिटांनी चांदीच्या उंबरठ्यावरून पुढे सरकत ५ वाजून ३९ मिनिटांनी पहिल्या पायरीवरून गाभाऱ्याकडे किरणांचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू झाला. ५ वाजून ४० मिनिटांनी गाभाऱ्याच्या दुसऱ्या पायरीवर तर ५ वाजून ४१ मिनिटांनी गर्भकुटीत, ५ वाजून ४४ मिनिटांनी देवीच्या चरणांना स्पर्श झाला. यावेळी गाभाऱ्यातील दिवे मालवण्यात आले. भाविकांनी जय अंबेचा गजर केला. त्यानंतर ५ वाजून ४५ मिनिटांनी देवीच्या गुडघ्यापर्यंत किरणे पडली, तर ५ वाजून ४६ ते ४८ मिनिटांच्या दरम्यान किरणे देवीच्या कटीमध्यापर्यंत पोहोचली आणि लुप्त झाली.

भाविकांची निराशा

देवीच्या मुखापर्यंत सूर्यकिरण पोहोचण्याची भाविकांची अपेक्षा अपूर्ण राहिली. तीन दिवसांच्या किरणोत्सवातील अखेरच्या टप्प्यातही सूर्यकिरणांनी देवीच्या मुखापर्यंत स्पर्श न केल्याने भाविकांना निराश होऊन परतावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT