वारणेचा ऐतिहासिक पूल 145 वर्षांनंतर आजही दिमाखात! Pudhari File Photo
कोल्हापूर

वारणेचा ऐतिहासिक पूल 145 वर्षांनंतर आजही दिमाखात!

ब्रिटिशकालीन स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा; नव्या युगातही बजावतोय महामार्गावरील अखंड वाहतूक सेवा

पुढारी वृत्तसेवा
राजकुमार बा. चौगुले

पेठवडगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वारणा नदीच्या पात्रात गेली 145 वर्षे दिमाखात उभा असलेला ऐतिहासिक दगडी पूल आजही अवजड वाहतुकीचा भार समर्थपणे पेलत आहे. 1880 च्या दशकात ब्रिटिश स्थापत्यकौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून बांधण्यात आलेला हा पूल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना जोडणारा एक अविभाज्य दुवा ठरला आहे. काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरे पाहिलेला हा पूल आजही आपल्या मजबुतीची साक्ष देत उभा आहे.

मुंबई-बंगळूर-चेन्नई या तत्कालीन महत्त्वाच्या आणि आता आशियाई महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या रस्त्याचे महत्त्व ब्रिटिश राजवटीत अनन्यसाधारण होते. ब्रिटिश फौजा, टपाल आणि विविध प्रकारच्या जीवनावश्यक साहित्याची वाहतूक याच मार्गाने होत असे. या मार्गावरील दळणवळणाची गरज ओळखून सर फिलिप वुड या गव्हर्नरच्या काळात जानेवारी 1876 मध्ये या पुलासाठी सर्वेक्षण करून बांधकामास सुरुवात झाली. हे काम एका ब्रिटिश कंपनीला देण्यात आले होते. दगड, माती व शिसे यांचा वापर करून, प्रत्येकी 45 मीटर रुंदीचे आठ भव्य वक्राकार दगडी गाळे वापरून हा 400 मीटर लांबीचा पूल साकारण्यात आला. प्रत्येक वक्राकार गाळ्याला ‘की स्टोन’ (की-स्टोन) वापरून विशेष मजबुती देण्यात आली. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कारकिर्दीत 20 जून 1881 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

विशेष म्हणजे, पूल उभारताना त्याचे आयुर्मान 100 वर्षे गृहीत धरण्यात आले होते. मात्र, आज 145 वर्षांनंतरही हा पूल केवळ टिकूनच नाही, तर अवजड ट्रक, बसेस आणि कंटेनर्सचा प्रचंड भारही लिलया सहन करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही असा पूल विरळाच! या पार्श्वभूमीवर, या 145 वर्षांच्या साक्षीदाराचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याच्या संवर्धनासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. जेणेकरून भावी पिढ्यांनाही हा स्थापत्यकलेचा अजोड वारसा अनुभवता येईल.

महाड दुर्घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिट

2 ऑगस्ट 2016 मध्ये महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राज्यातील सर्वच बि—टिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यानुसार या पुलाचे व्हीजेटी इन्स्टिट्यूट (मुंबई) या संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले. यासाठी अत्याधुनिक चाचणीयंत्राद्वारे पुलाच्या स्थितीचे अवलोकन करण्याबरोबरच पुलाचा भार सोसण्याची क्षमताही (स्पॅन लोड टेस्ट) तपासण्यात आली, यानंतर हा पूल भक्कम असल्याचा निर्वाळा देण्यात आला. दहा वर्षांनंतर आता या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT