जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गुरुवारी (दि. 16) जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ऐतिहासिक 24 वी ऊस परिषद होणार आहे. यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातून शेतकरी हजारोंच्या संख्येने दाखल होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली असून, राजू शेट्टी पहिली उचल किती मागणार, याकडे राज्यासह कर्नाटक सीमाभागाचे लक्ष लागून राहिले आहे.
या ऊस परिषदेत पहिल्या उचलसह विविध मागण्या केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर एकरकमी एफआरपी, महापूर, अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे झालेले नुकसान आणि शासनाकडून मिळणारी भरपाई, यावर चर्चा होणार आहे. वाढती महागाई, कर्जमाफी, उसाचा दर, शेतकर्यांपुढे ऐनवेळी येणारे संकट यासह विविध बाबींबर ऊहापोह होणार आहे. यात राज्यासह सीमाभागातील शेतकरी व स्वाभिमानीचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने हजेरी लावणार आहेत. या ऊस परिषदेच्या बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर जयसिंगपूर नगर परिषदेसमोर असलेल्या विक्रमसिंह क्रीडांगणावर ऊस परिषद होणार आहे. यासाठी कर्नाटकातून येणार्या शेतकर्यांसाठी बौद्ध विहार, स्टेडियम परिसर, दसरा चौक. सांगली-सोलापूर परिसरातून येणार्या शेतकर्यांसाठी सिद्धेश्वर मंदिर, झेले चित्रमंदिर व कोल्हापूर, हातकणंगलेहून येणार्या शेतकर्यांसाठी शिवतीर्थ परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत मुख्य महार्गावरील कोल्हापूर, इचलकरंजीकडून सांगली, मिरजकडे जाणारी वाहतूक तमदलगे येथून उदगाव बायपासवरून, तर सांगली, मिरजकडून कोल्हापूर, इचलकरंजीकडे येणारी वाहतूक ही उदगाव बसस्थानक ते केपीटीमार्गे चौंडेश्वरीमार्गे वळविण्यात येणार आहे.