कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजित वसंतराव सावंत (रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांना मोबाईलवरून प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकीसह शिवीगाळीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला. या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीसह कारवाईचे त्यांनी आदेश दिले आहेत. आवश्यकता भासल्यास सावंत यांना सुरक्षा यंत्रणा पुरविण्याचे आदेशही दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार पोलिस अधीक्षक पंडित यांनी इंद्रजित सावंत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मोबाईलवर आलेल्या धमकीबाबतही त्यांच्यात बोलणे झाले. सावंत यांनी कोरटकर नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर केलेल्या संभाषणाची व्हिडीओ क्लिपही पोलिस अधीक्षकांना सादर केली.
दरम्यान, सायंकाळी इंद्रजित सावंत यांनी सायंकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संशयित व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे. सावंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (दि.25) रात्री 12 वाजून 3 मिनिटांनी मोबाईलवर फोन करून प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन भिन्न गटामध्ये शत्रुत्व वाढेल किंवा एकोपा टिकण्यास बाधा निर्माण होऊन विशिष्ट वर्गाच्या धार्मिक भावना दुखविणारे कृत्य करून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावरून बदनामीचा मेसेज प्रसारित केल्याबद्दल इंद्रजित सावंत यांनी संशयित प्रशांत कोरटकर असे नाव सांगणार्या व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. धमकी देणार्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिस अधिकार्यांची मदत घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत गंभीर दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सखोल चौकशी व कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यकता भासल्यास सावंत यांना सुरक्षा यंत्रणा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत, असेही पंडित यांनी सांगितले. इंद्रजित सावंत यांच्याशी आपण संपर्क साधला आहे. त्यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
इंद्रजित सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. संशयित व्यक्तीने दिलेल्या धमकीबाबतही त्यांना माहिती दिली आहे. सुरक्षा यंत्रणा पुरविण्याबाबतही पोलिस अधीक्षकांनी विचारणा केली आहे. मात्र आपणाला सुरक्षा यंत्रणेची गरज नसल्याचे सांगितले. मावळ्यांचे मोठे कवच आपल्याभोवती असल्याने बंदोबस्ताची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.