हिंदी भाषा दिन विशेष  file photo
कोल्हापूर

Hindi Diwas 2024 | अनुवादित हिंदी साहित्याने जोडली भाषिक वाचकांची नाळ

हिंदी भाषा दिन विशेष | अन्य भाषांतील साहित्याचा सर्वाधिक अनुवाद हिंदी भाषेतून

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : हिंदी ही राजभाषा असल्याने आणि देशात बहुतांश ठिकाणी हिंदी भाषेचा वापर होत असल्याने साहित्यातील अनुवादाच्या प्रांतात हिंदी भाषेने अन्य भाषिक वाचकांचे बंध गुंफण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रवासवर्णन, आत्मचरित्र, कादंबरी, काव्यसंग्रह यासह विविध साहित्यप्रकारांना हिंदी भाषेने जगभरातील वाचकांना अनुवादाच्या माध्यमातून जोडून ठेवले आहे. (Hindi Diwas 2024)

साहित्य क्षेत्रात हिंदी भाषेतून अनुवादित झालेल्या साहित्याची संख्या लक्षणीय आहे. यामुळेच हिंदी भाषा पुस्तकांच्या रुपाने वाचकांपर्यंत पोहोचली तर आहेच; पण भाषेचे अडथळे दूर करून विविध भाषेतील स्थानिक लेखकांचे साहित्य विस्तारण्यात हिंदी भाषेचा मोठा वाटा आहे. दया पवार यांचे ‘बलुतं’, शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’, पी. इ. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे मराठीतील साहित्य हिंदी अनुवादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. लिखित साहित्याबरोबरच मराठी नाटकांनाही हिंदीने जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचवले आहे. (Hindi Diwas 2024)

यामध्ये मामा वरेरकर यांच्यापासून विजय तेंडुलकर ते महेश एलकुंचवार, प्रेमानंद गज्वी यांच्यापर्यंत अनेक मराठी नाटककारांच्या नाट्यकृती. हिंदी भाषेत अनुवादित होऊन रंगमंच गाजवण्यात यशस्वी झाल्या आहेत. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, संत मीरा यांच्या रचनांचा हिंदी अनुवादित साहित्यात प्रामुख्याने उल्लेख केला जातो.

हिंदी भाषेतून अनुवाद करण्यास प्राधान्य

बंगाली, कानडी, तेलुगू या भाषेतील बरेच साहित्य हिंदीतून अनुवादित झाले आहे. बंगाली भाषेतील कवितांचा फार मोठा संग्रह हिंदीतून अनुवादित होऊन तो जगभरातील अनेक भाषिक वाचकांच्या हाती विसावला आहे. हिंदी भाषा समजणार्‍या वाचकांची संख्या जास्त असल्याने अन्य भाषेतील साहित्याच्या अनुवादासाठी हिंदी भाषेला प्राधान्य दिले जात असल्याचे प्रकाशकांचे निरीक्षण आहे. त्यामुळेच मूळ ज्या भाषेत साहित्य प्रकाशित होते ते कालांतराने हिंदी भाषेतून अनुवादित करण्याचा आग्रह प्रकाशक धरतात.

हिंदी भाषा दिन का साजरा होतो?

14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन (Hindi Diwas 2024) म्हणून साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 या दिवशी हिंदी भाषेला ‘राजभाषा’ ही मान्यता देण्यात आली. तेव्हापासून प्रशासकीय कामकाजात हिंदी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT