महाराष्ट्रात सध्या त्रिभाषा सूत्रावरून वाद पेटला आहे. मराठी, इंग्रजी भाषा सक्तीची असताना आता तिसरी भाषा म्हणून हिंदी शालेय शिक्षणात पहिलीपासून सक्ती करण्याचे सरकारचे धोरण आहे. याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्र हे देशातील भाषिक विविधतेचे अनोखे उदाहरण आहे. राज्याची ओळख जरी मराठी भाषेमुळे असली, तरी येथे अनेक भाषा आणि बोली एकत्र नांदतात.
2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी होती. यातील सुमारे 69 टक्के लोक मराठी बोलतात. पश्चिम महाराष्ट्रात हा आकडा 90 टक्केपर्यंत पोहोचतो, तर मुंबईसारख्या महानगरात केवळ 35 टक्के लोक मराठी भाषिक आहेत. संपूर्ण राज्यात सुमारे 8 कोटी मराठी भाषिक आहेत.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असली तरी दुसर्या क्रमांकावर हिंदी भाषा आहे. मुंबईत 25 टक्के आणि पुण्यात 20 टक्के लोकसंख्या हिंदी बोलते. नागपूरमध्येही हिंदी भाषिकांची मोठी संख्या आहे. मराठवाड्यात 8 ते 10 टक्के लोकसंख्या हिंदी बोलते. राज्यात एकूण 1 कोटी हिंदी भाषिक आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये हिंदीचा प्रभाव अधिक जाणवतो.
मराठी आणि हिंदीनंतर काही जिल्ह्यांमध्ये उर्दू ही प्रमुख भाषा आहे. अकोला, संभाजीनगर, परभणी आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उर्दू भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. मराठवाड्यात सुमारे 10 टक्के लोकसंख्या उर्दू बोलते. पश्चिम महाराष्ट्रात मात्र उर्दू भाषिक दुर्मीळ आहेत. राज्यात एकूण 75 लाख उर्दू भाषिक आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातील बंजारा समाज प्रामुख्याने राजस्थानी भाषा बोलतो. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत या समाजाची संख्या सर्वाधिक आहे. अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या या समाजाने मराठी संस्कृतीत आपले स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राच्या रंगात ते मिसळून गेले असले तरी त्यांनी आपली भाषिक संस्कृती मात्र जपली आहे. राज्यात 25 लाखांहून अधिक राजस्थानी भाषिक आहेत.
मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांमध्येच गुजराती भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. राज्यात एकूण 24 लाख गुजराती भाषिक आहेत. सीमावर्ती भागात कन्नड आणि तेलुगू भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. सोलापूर हे या भाषिकांचे प्रमुख केंद्र आहे. अन्न उद्योगात या समाजाचा प्रभाव जाणवतो. महाराष्ट्रात 23 लाख कन्नड आणि तेलुगू भाषिक आहेत.
महाराष्ट्रातील भाषिक विविधता ही राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे द्योतक आहे. मराठी भाषेच्या बळावर राज्याची ओळख जपली जाते. पण इतर भाषिक समाजांनीही महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घातली आहे. विविध भाषांचा संगम आणि एकमेकांच्या संस्कृतीचा स्वीकार, हेच महाराष्ट्राच्या एकात्मतेचे खरे वैशिष्ट्य आहे.
मुंबईत मराठी भाषिकांचे प्रमाण 35.4 टक्के इतके आहे. इतर भाषांचा विचार करता मुंबईमध्ये सर्वाधिक 24.78 टक्के लोक हिंदीचा वापर करतात, तर 11.48 टक्के लोक गुजराती बोलतात. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक उर्दू भाषिकांचे प्रमाण 17.33 टक्के आहे. राजस्थानी बोलणार्यांची संख्या यवतमाळमध्ये सर्वाधिक असून 13.69 टक्के लोक बोलतात. सोलापूरमध्ये सर्वाधिक (2.28 टक्के) कन्नड भाषिक आहेत.
मराठी भाषिकांचा विचार केला तर सातारा जिल्हा आघाडीवर असून येथील 95.05 टक्के लोक मराठी बोलतात. त्यापाठोपाठ भंडारा येथे 93.19 टक्के लोक मराठी भाषिक आहेत. तिसर्या क्रमांकावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 91.02 टक्के लोक मराठी भाषेचा वापर करतात. कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर असून येथील 89.16 टक्के लोक मराठी भाषिक आहेत. पुण्यात 78.17 टक्के, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 69.66 टक्के लोक मराठी बोलतात. सर्वात कमी प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात असून तेथे 16.06 टक्के लोक मराठीचा वापर करतात.