Kolhapur Highway Accidents | महामार्ग जीवघेणे झाले... २२३ जणांचे बळी गेले 
कोल्हापूर

Kolhapur Highway Accidents | महामार्ग जीवघेणे झाले... २२३ जणांचे बळी गेले

दोन वर्षांतील बळींचा आकडा सहा महिन्यांतच ओलांडला; रखडलेले काम, अरुंद रस्त्‍यांमुळे अपघातांची संख्या वाढली

पुढारी वृत्तसेवा

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले असून, मागील दोन वर्षांतील अपघातांची संख्या या सहा महिन्यांतच ओलांडली आहे. जून अखेर ५५३ अपघात झाले असून, २२३ जणांचे बळी गेले आहेत. यामध्ये ४९९ जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील रस्त्यांचे रखडलेले काम, काही ठिकाणी नव्याने झालेल्या रस्त्यांमुळे वाहनांचा वाढलेला वेग, ब्लॅक स्पॉट, मद्य प्राशन आणि विनाहेल्मेट प्रवास यामुळे महामार्गावरील अपघातांची मालिका वाढतच आहे.

या मार्गावर वाढले अपघाताचे प्रमाण

कागल-मुदाळ तिट्टा मार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्नाटकातून कोल्हापूरकडे येणारी किंवा जाणारी वाहतूक आरटीओ चेकपोस्ट आणि जीएसटी नाका चुकविण्याच्या नादात या मार्गाकडे वळली आहे. तसेच संकेश्वर - बांदा महामार्गावरील ७० किलोमीटरचा रस्ता जिल्ह्यात येतो. या मार्गावर नवीन रस्ता झाल्याने प्रचंड वेगाने येणारी वाहने, दिशादर्शक फलकांचा, ब्लॅक स्पॉटवरील उपाययोजानांच्या अभावामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. लक्ष्मी टेकडी परिसरातही अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. याचसोबत नागपूर - रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.

उपाययोजना करणे गरजेचे

२०२४ मध्ये १३९, तर २०२५ मध्ये १०६ जण रस्ते अपघातामध्ये मृत झाले आहेत. या दोन वर्षांतील (२४ महिने) मृतांची संख्या २०२६ मध्ये जूनपर्यंतच झाली आहे. यंदा २२३ जणांनी आपला प्राण महामार्गावरील रस्ते अपघातामध्ये गमावला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT