'Pudhari' sting operation | ‘झिंगाट’ टोळीचा नवा फंडा... ‘बनावट दारू’वर गांजाचा सौदा! Pudhari File Photo
कोल्हापूर

'Pudhari' sting operation | ‘झिंगाट’ टोळीचा नवा फंडा... ‘बनावट दारू’वर गांजाचा सौदा!

‘पुढारी’ स्टिंग ऑपरेशन : शहर, उपनगरांत हायप्रोफाईल तस्करी

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : सरत्या वर्षाचा शेवट... थर्टी फर्स्ट आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तस्करी टोळ्यांचे नवनवे फंडे सुरू झाले आहेत. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून अवघ्या 250 रुपयांत चौका-चौकांसह निर्जन ठिकाणी नशिली झिंग देणार्‍या गोवा बनावटीच्या दारूसह गांजाची खुलेआम तस्करी सुरू झाली आहे. ‘पुढारी’च्या स्टिंग ऑपरेशनद्वारे ‘झिंगाट’ टोळीचा पर्दाफाश झाला आहे. रविवार आणि शुक्रवार सकाळ- सायंकाळी मध्यवर्ती परिसरात ‘गोवा बनावटीवर गांजा फ्री...’ असा हायप्रोफाईल तस्करीचा फंडा फोफावू लागला आहे.

शहरातील कळंबा रोड, रामानंदनगर पूल ते कळंबा कारागृह रोड, हॉकी स्टेडियम, शेंडा पार्क, आर.के.नगर, शाहू टोल नाका, उजळाईवाडी उड्डाण पूल परिसर, गोकुळ शिरगाव परिसर, टेंबलाई टेकडी, तावडे हॉटेल, सांगली फाटा अन् शिवाजी पुलासह इराणी खण परिसरात ‘झिंगाट’ टोळीतील साथीदारांची बेधडक उलाढाल सुरू आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने कळंबा कारागृह रोडवर निर्जन ठिकाणी झाडाच्या आडोशाला थांबलेल्या तरुणाला रविवारी सकाळी 9.30 वाजता गाठले.

चला...चला... थांबू नका... अक्षरश: ढकलून देत हाकलले जाते!

व्यवहार झाल्यानंतर ‘चला...चला... थांबू नका...’ असे म्हणत अक्षरश: दुचाकी ढकलत परतवून लावले. त्यांनतर पुन्हा दुसरी शिकार... दहा ते पंधरा मिनिटांत सारा माल खल्लास... पुन्हा दुसर्‍या साथीदाराला मालासह बोलावून घेत जागा बदलून उलाढाल सुरू... प्रमुख चौकासह निर्जन ठिकाणी गोवा बनावटीची दारू आणि गांजा पुरविणार्‍या किमान चार ते पाच टोळ्या प्रत्येक रविवार, शुक्रवार सकाळ - सायंकाळी (6 नंतर) कार्यरत होत आहेत.

माल छोटा या बडा..? 250 रुपये निकालो..!

लहान-मोठ्या आकाराच्या गांजाच्या पुड्यांनी फुल्ल भरलेली मोपेडची डिकी आणि खाकी रंगाच्या पिशवीत गोवा बनावटीच्या दारूच्या प्लास्टिक बंद बाटल्यांचा साठा कब्जात बाळगलेले 20 ते 25 वयोगटातील दोन तरुण ‘सावज’ शोधत होते. झाडाच्या आडोशाला थांबलेल्या तरुणाला हाताने खुनावल्यानंतर ‘माल छोटा या बडा...’ असे विचारले. प्रस्तूत प्रतिनिधी म्हणाला, छोटावाला... 250 रुपये निकालो...! खिशातून 250 रुपये हातावर ठेवल्यानंतर दुसर्‍याने लागलीच मोपेडच्या डिकीतील गांजाची पुडी आणि पिशवीतील 180 मिलीची दारूची बाटली काढून प्रस्तूत प्रतिनिधीच्या पँटच्या खिशात अक्षरश: कोंबली.

फोन करताच गांजामिश्रित मावा हातात पोहोच; झटपट सेवा

गांजा आणि बनावट दारूच्या बेधडक तस्करीचा शहरात सिलसिला सुरू असतानाच गांजामिश्रित माव्याला तरुणाईकडून प्रचंड मागणी होऊ लागली आहे. शिवाजी पूल, शेंडा पार्क, आर.के.नगर परिसरात गांजामिश्रित माव्याची सर्रास विक्री होऊ लागली आहे. 17 ते 25 वयोगटातील तरण्याबांड पोरांचे तोबरे मावा, गुटख्यांनी भरलेले असतात. सार्वजनिक ठिकाण, भिंती, रस्त्यावर पिचकार्‍या दिसून येत आहेत.

घसघशीत कमाईमुळे स्थानिक गुन्हेगारही सक्रिय

घसघशीत मिळणार्‍या कमाईमुळे स्थानिक टोळ्यांतील सराईत गुन्हेगारही तस्करी उलाढालीत सक्रिय होऊ लागले आहेत. परिणामी, तस्करीचा पसारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. पोलिस अधीक्षकांच्या बडग्यामुळे काळे धंदे ओस पडले आहेत. त्यामुळे झटपट आणि घसघशीत मिळणार्‍या कमाईमुळे बेरोजगारही सक्रिय होऊ लागले आहेत.

गांजामिश्रित माव्याची मोबाईलवर ऑर्डर

मोबाईलवरून ऑर्डर द्यायचा अवकाश...आठ ते दहा मिनिटांत मावा जागेवर पोहोच करण्याची सेवाही सुरू झाली आहे. काही टपर्‍यांवर तर मावा बनविण्यासाठी गांजाच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. शहर, जिल्ह्यात काही ठिकाणी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आरोग्याला घातक ठरणार्‍या माव्यांची सर्रास विक्री होत असतानाही अधिकार्‍यांसह पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT