Gokul election 
कोल्हापूर

Gokul election | राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, जनसुराज्यमध्ये इच्छुकांची मांदियाळी; पॅनेलची रचना ठरणार डोकेदुखी

पुढारी वृत्तसेवा

आशिष ल. पाटील

गुडाळ : ‘गोकुळ’च्या निवडणूक पार्श्वभूमीवर गेले काही महिने महायुती अंतर्गत सुरू असलेले शह काटशहाचे राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते ‘हम साथ साथ है’ म्हणत एका जाजमावर बसले असले, तरी प्रत्येक घटक पक्षातील इच्छुकांची मांदियाळी पाहता ‘गोकुळ’चे जागावाटप हा कळीचा ठरणारा मुद्दा कसा सुटणार? यावरच निवडणुकीतील महायुतीचे यश अवलंबून राहणार आहे.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य शक्ती या घटक पक्षांचा समावेश आहे. ‘गोकुळ’मध्ये निर्वाचित संचालक मंडळाच्या 25 जागा आहेत. मात्र, या चारही घटक पक्षांत इच्छुकांची एवढी मांदियाळी आहे की, पॅनेलची रचना ही सर्वच पक्षांना मोठी डोकेदुखी ठरणार आहे. पॅनेलमध्ये उमेदवारी न मिळणार्‍या इच्छुकांची नाराजी कोणत्या थराला जाणार यावरच संपूर्ण पॅनेलचे यश अवलंबून राहणार आहे.

महायुतीअंतर्गत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. ‘गोकुळ’च्या विद्यमान पाच संचालकांसह अपवाद वगळता प्रत्येक तालुक्यातील इच्छुकांची मोठी मागणी राष्ट्रवादीकडे आहे. सहा महिन्यांपूर्वी ठरावांच्या जोडणीसाठी मुश्रीफ यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रमुख इच्छुकांना रसद पुरवून कामाला लावले होते. आपली उमेदवारी निश्चित समजून या इच्छुकांनी ठरावांच्या मोठ्या जोडण्या लावल्या आहेत. या इच्छुकांना न्याय देण्याचे मोठे आव्हान मुश्रीफ यांच्यासमोर असेल.

राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीतील ‘गोकुळ’चे सर्वाधिक विद्यमान सहा संचालक शिवसेनेचे आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धैर्यशील माने, आ. चंद्रदीप नरके, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक यांना आपल्या समर्थकांना महायुतीच्या पॅनेलमध्ये संधी मिळवून देताना ताकद पणाला लावावी लागणार आहे. भाजपकडे सध्या इच्छुकांची संख्या तुलनेने कमी असली, तरी राज्याच्या सत्तेत मोठा भाऊ असणार्‍या भाजपला ‘गोकुळ’मध्येही मोठा भाऊ बनायचे आहे. साहजिकच महायुतीच्या पॅनेलमध्ये उमेदवारी म्हणजे संचालकपद नक्की ही धारणा असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे.

बिनविरोधची चाचपणी की, एकतर्फी लढतीची तयारी?

महायुतीमधील अंतर्गत वादाचा फटका निवडणुकीत बसू नये, शिवाय खर्च टाळण्यासाठी आ. सतेज पाटील गटाला काही जागा सोडून निवडणूक बिनविरोध करावी, असा महायुतीतील काही घटकांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना यश आल्यास निवडणूक बिनविरोध किंवा एकतर्फी होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT