High Court Bench | शेंडा पार्कमधील ८२ एकर जागेत साकारणार खंडपीठाचा परिसर 
कोल्हापूर

High Court Bench | शेंडा पार्कमधील ८२ एकर जागेत साकारणार खंडपीठाचा परिसर

आकर्षक इमारतीसह पायाभूत सुविधा; भुयारी मार्ग

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शेंडा पार्क येथील सुमारे ८२ एकर परिसरात मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित कोल्हापूर खंडपीठाचा परिसर साकारणार आहे. खंडपीठाची मुख्य प्रशासकीय इमारत, न्यायमूर्तींची निवासस्थाने यासह कार्यालय, सेवा निवासांच्या आकर्षक इमारती आणि सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे काम नियमितपणे सुरू आहे. या सर्किट बेंचचे आता कायमस्वरूपी खंडपीठात रूपांतर होणार आहे. याकरिता शेंडा पार्क येथे प्रस्तावित खंडपीठाच्या नियोजित इमारतीसाठी ९ हेक्टर १८ आर ४० चौ. मी. म्हणजेच सुमारे २३ एकर जागा महसूल विभागाने दिली आहे. ६८ कोटी ५१ लाख १८ हजार रुपये किंमत अदा करून राज्य शासनाने ही जमीन महसूल मुक्त किमतीने व कब्जा हक्काने सर्किट बेंचकडे यापूर्वीच वर्ग केली आहे.

खंडपीठासाठी आणखी ६२ एकर जागेची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर होताच ही प्रक्रियाही गतीने केली जाणार आहे. यापूर्वीच देण्यात आलेली २३ एकर जागा आणि नव्याने उपलब्ध होणारी ६२ एकर जागा यामुळे सुमारे ८५ एकर जागेत संपूर्ण खंडपीठाचा परिसर उभारला जाणार आहे.

भुयारी मार्ग करा

यापूर्वीची २३ एकर जागा आणि प्रस्तावित ६२ एकर जागा यामधून विकास आराखड्यातील एक रस्ता जात आहे. यामुळे प्रस्तावित खंडपीठाच्या परिसराचे दोन भाग होणार आहेत. एका जागेत खंडपीठाची मुख्य प्रशासकीय इमारत तर दुसऱ्या भागात निवासस्थाने, पार्किंग आदींचे नियोजन आहे. या दोन जागांमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून निवासस्थान ते मुख्य इमारत असे ये-जा करताना प्रशासनावर बंदोबस्ताचा ताण कायम राहणार आहे. यामुळे या दोन जागा जोडण्यासाठी भूयारी मार्ग करा, अशी सूचना यावेळी मुख्य न्यायमूर्ती घुगे यांनी केली.

प्रस्तावित खंडपीठ परिसर असा असेल

३० न्यायालयीन कक्ष

मुख्य न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र निवासस्थाने

सेवा निवास

४ प्रशासकीय इमारती

सरकारी वकिलांसाठी चेंबर्स

मध्यस्थी केंद्र, व्हिडीओ कॉन्फरन्स हॉल

परिषद हॉल, पुरेसे अभिलेखागार

१ हजार चारचाकी, २ हजार दुचाकी पार्किंग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT