पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई उच्च न्यायालयाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाई स्थगिती दिली आहे. विशाळगडावरील आतिक्रमणाबाबत आज (दि.१९) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. " भर पावसात घरांवर हातोडा का?'' असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे. (Vishalgad Encroachment)
भर पावसात घरांवर हातोडा का? असे म्हणत न्यायालयाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात सुरु असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, प्रांताधिकार्यांनी पांढरेपाणी ते विशाळगड मार्ग आणि संपूर्ण विशाळगड परिसरासाठी काढलेला संचारबंदी आदेश शुक्रवारी (दि. 19) रात्री 12 वाजेपर्यंत लागू केली होती. यानंतर संचारबंदी शिथिल होण्याची शक्यता आहे. ही संचारबंदी मागे घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, अतिक्रमण मोहीमही जवळपास पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी शनिवारपासून शिथिल होईल, अशीच शक्यता आहे.
रविवारी (दि. १४) विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागले. आणि गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापुरातील मुसलमानवाडीला अज्ञात आंदोलकर्त्यांनी वस्तीला टार्गेट करत घरांचे, गाड्यांचे, मशिदीचे, प्रापंचिक साहित्यांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. ऐन पावसात हा हल्ला झाल्याने जीवाच्या आकांताने वाट दिसेल तिकडे रहिवासी पळालेत. आणि आपला जीव वाचवला.
तोडफोड शांत झाल्यानंतर वस्तीत येऊन पाहतात. तर घरात प्रापंचिक साहित्य इतरत्र विखुरलेले, चारचाकी-दोनचाकी वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक, घराला गळती, फुटलेली कौले, पत्रे, गॅस टाक्या, पाण्याच्या बॉटल आणि निवासाची गैरसोय पाहून अक्षरशः बालके, महिला, पुरुष मंडळी गळून पडली. जगणेच उद्ध्वस्त झाल्याने संसार सावरायचा कसा?, याची चिंता लागली होती. डोळ्यांचे अश्रू काही कमी होईनात, चिंता, भीती, मुलांचे शैक्षणिक नुकसान, आर्थिक नुकसान, घरांची उभारणी, त्याला लागणारा पैसा कोठून आणायचा या विवंचनेत येथील नुकसानग्रस्त आहेत.
आंदोलनाचे नेतृत्व करणार्या माजी खासदार संभाजीराजे यांनी अतिक्रमण हटवण्याबाबत आदेश दिल्याखेरीज गड सोडणार नाही, असा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार (दि. 15) पासून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, अशी ग्वाही दिली होती. दरम्यान, रविवारी मध्यरात्री कोल्हापूर विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी अतिक्रमण कारवाई तत्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. 15) जिल्हा प्रशासनाने गडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली. महसूल विभागाचे 90 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मजूर असे 150 तसेच पुरातत्त्व, महावितरण, ग्रामपंचायत व वन विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांच्या मदतीने व 250 पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाने तब्बल 94 अतिक्रमणे जमीनदोस्त केली. नागरिकांनीही स्वत:हून 10 अतिक्रमणे काढून घेतली.
दरम्यान, प्रांताधिकार्यांनी पांढरेपाणी ते विशाळगड मार्ग आणि संपूर्ण विशाळगड परिसरासाठी काढलेला संचारबंदी आदेश शुक्रवारी (दि. 19) रात्री 12 वाजेपर्यंत लागू आहे. यानंतर संचारबंदी शिथिल होण्याची शक्यता आहे. ही संचारबंदी मागे घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, अतिक्रमण मोहीमही जवळपास पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी शनिवारपासून शिथिल होईल, अशीच शक्यता आहे.