चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : ताराबाई पार्क - नागाळा पार्कात दहशत निर्माण करणारा बिबट्या नेमका आला कोठून, याचे गूढ उकलण्याचे व ते जनतेसमोर आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही केवळ प्रशासनाने चौकशी केली व वन विभागाला अहवाल पाठविला यावर समाधान मानू नये . बिबट्या कोठून आला? तो पाळीव होता का? पाळीव असल्यास त्यासाठी संबंधितांकडे त्याची परवानगी होती का? बिबट्या पाळीव असेल, तर तो ज्यांच्या ताब्यात होता त्यांच्या सुरक्षेतून सुटला कसा? त्यानंतर त्याची वर्दी वन विभाग व पोलिसांना दिली होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळायला हवीत, याचा आग्रह लोकप्रतिनिधींनी धरण्याची गरज आहे.
रविवारी बिबट्या मेरी वेदर ग्राऊंडच्या परिसरात दिसल्याचा दावा करण्यात आला होता. रविवार, सोमवार बिबट्याचे वास्तव्य ताराबाई पार्क, नागाळ पार्क परिसरातच होते. वन विभागाच्या थर्मल कॅमेर्यातही तो दिसून आल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. ते खरे असेल, तर वन विभागाने का दुर्लक्ष केले, असा प्रश्न तयार होतो. रविवारी या परिसरात बिबट्या पाहिल्याचे काहींनी ठामपणे सांगितले होते. सोमवारी पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रादेशिक परिवहन कार्यालय व एसटी कॉलनी परिसरात बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्याने कुत्र्यांचा पाठलाग केल्याचे या सीसीटीव्हीत दिसते; मात्र त्याची चौकशी करावी, असे कोणालाही वाटले नाही. तसे झाले असते, तर मंगळवारचा जो काही गोंधळ झाला, तो टाळता आला असता. बिबट्या जेरबंद केला. नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आले; मात्र जंगलात गेलेल्या बिबट्याने अनेक प्रश्नांची मालिका मागे सोडली आहे. या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळायलाच हवीत.
दहा वर्षे झाली, तरी चौकशी सुरूच
बिबट्या पाळीव होता याची चर्चा आहे. यापूर्वी दि. 1 जानेवारी 2015 रोजी रुईकर कॉलनीत अचानकपणे आलेल्या बिबट्याने अशीच दहशत निर्माण केली होती. कोल्हापुरात सर्वत्र 31 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत नववर्ष स्वागताचा जल्लोष सुरू असताना हा बिबट्या शहरात आलाच कसा, याची चर्चा जोरात होती. बिबट्या पाळीव होता का, याची चौकशी दहा वर्षे झाली, तरी सुरूच असावी, असे वाटते. कारण, चौकशीत काय निष्पन्न झाले, ते अद्याप समोर आलेले नाही.