Helmet campaign | कोल्हापूर जिल्ह्यात 16 मार्चपासून हेल्मेट तपासणी मोहीम 
कोल्हापूर

Helmet campaign | कोल्हापूर जिल्ह्यात 16 मार्चपासून हेल्मेट तपासणी मोहीम

‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ अभियानाची अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 16 मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर केवळ कायदेशीर बंधन नसून, स्वतःचा जीव वाचविण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट योग्य पद्धतीने (पट्टा घट्ट बांधून) वापरणे अत्यावश्यक आहे.

वाहन चालविताना चालकासह मागील आसनावरील प्रवाशानेदेखील हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाका, कागल व किणी टोल नाका येथे ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ अभियान राबविण्यात येणार आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना महामार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गावर विनाहेल्मेट वाहन चालवू नये. कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा आणि ‘हेल्मेट वापरा-जीवन वाचवा’ हा संदेश सर्वत्र पोहोचवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT