कोल्हापूर; टीम पुढारी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह खानदेशातील सर्व जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. मराठवाड्यात एकूण 1 हजार 4 गावे अतिपावसामुळे बाधित झाली आहेत. यात सर्वाधिक 844 गावे ही एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तर खानदेशांत संततधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसामुळे राधानगरी, कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्यांत पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात एकूण 1 हजार 4 गावे अतिपावसामुळे बाधित झाली आहेत. यात सर्वाधिक 844 गावे ही एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. हिंगोली जिल्ह्यातील येलदरी, इसापूर, सिद्धेश्वर धरणांतून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी सिद्धेश्वर धरणाचे 12 दरवाजे उघडून 45,548 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाचे सोमवारी सकाळी 7.45 वाजता एकूण 10 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. यामुळे पूर्णा नदीपात्रात 21100.40 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड जिल्ह्यात रविवार-सोमवारी अतिवृष्टी झाली. लेंडी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यानंतर मुखेड तालुक्यातील 9 गावे आणि परिसर जलमय झाला. हसनाळ येथील 5 व्यक्ती बेपत्ता झाल्या. त्यांचा शोध सुरू आहे. याच भागात रस्त्यावरच्या पुलावरून एक मोटार पाण्यात वाहून गेली. रविवार व सोमवारी लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून तब्बल 17 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बीड जिल्ह्यात मागील 24 तासांपासून सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्या तुडुंब भरल्या आहेत. पुराच्या पाण्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही ठिकाणी पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पावसात एक जण वाहून गेला असून अन्य तीन जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे सात स्वयंचालित दरवाजे खुले झाले असून सात दरवाजांतून 10,000 क्युसेक तर वीजगृहातून 1500 असा एकूण 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. सोमवारी दुपारी कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटांवरून तीन फूट, तर रात्री आठ वाजता पाच फूट वर उचलण्यात आले. त्यातून 35,100 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, धरणांत पाण्याची आवक वाढेल त्या पटीत पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने जादा पाणी सोडणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. तर सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 16.2 मिलिमीटर पाऊस शिराळा तालुक्यात झाला आहे. चांदोली धरणात 12244 पाण्याची आवक होत असून धरण 91.80 टक्के भरलं आहे.
दोन दिवसांपासून जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने नदी-नाल्यांना पूरस्थिती उद्भवली असून शेती पिकांसह अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात भिंत अंगावर पडल्याने सात शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. पातोंडा येथे घरात पाणी पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांच्या संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र श्रावण सरी बसरत असून बहुतांशी भागांत जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जळगाव जिल्ह्याला रविवारी रात्री तसेच सोमवारी दिवसभर पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे केळी बागांसह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकर्यांचे पशूधन मूत्युूमुखी पडल्याची घटना घडल्या आहेत. विशेषत रावेर, पाचोरा, बोधवड, गडगाव, जळगाव भागांत पावसाचा चांगलाच तडाखा बसला. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांशी भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात श्रावण सरी कोसळत असून अद्याप जोरदार पावसाची शेतकर्यांना प्रतिक्षा आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत झालेल्या समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील धरणांत 84 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे.