रत्नागिरी : जुलैमध्ये दमदार बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा जोर धरला आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागांत मुसळधार सरी कोसळल्या. मंगळवारी यलो अलर्ट असल्याने सकाळपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागली. सखल भागांत पाणी साचले.
दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २३६.६० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, बुधवारपासून ग्रीन अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील काळात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने भात शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे. भात पिकाला सध्या पाण्याची गरज असल्याने झालेला पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. सकाळ, दुपार आणि रात्री अशा तिन्ही सत्रांत पावसाच्या सरी कोसळत असल्याने जिल्ह्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. पावसानंतर काही वेळ कडक ऊन पडत असल्याने ऊन, सावली आणि पावसाचा लंपडाव सुरू आहे.
चिपळूणमध्ये सर्वाधिक
गेल्या २४ तासांत चिपळूणमध्ये सर्वाधिक ३४.५० मि.मी., खेडमध्ये ३४.१० मि.मी. आणि राजापूरमध्ये ३०.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. गुहागर २८.१०, लांजा २८.६०, दापोली २७.३०, संगमेश्वर २०.२०, रत्नागिरी १८.२०, तर मंडणगडमध्ये १५ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १ हजार ९३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
मंडणगड १५, दापोली २७.३०, खेड ३४.१०, गुहागर २८.१०, चिपळूण ३४.५०, संगमेश्वर २०.२०, रत्नागिरी १८.२०. लांजा २८.६०, राजापूर ३०.६० मि.मी.