कोल्हापूर : शहरात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत राधानगरीसह 15 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. शनिवारी चौथ्यांदा पात्राबाहेर आलेले पुराचे पाणी रविवारी गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्यावर असणार्या कै. आ. संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्यासमोरील रस्त्याला लागले आहे. रात्री 10 वाजता पंचगंगेची पातळी 35 फुटांवर होती.
राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून व पॉवर हाऊसमधून 4356 क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले असून सुमारे 120 गावांचा थेट संपर्क तुटला आहे. सात मार्गावरील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे.
दोन दिवसांच्या रिपरिपीनंतर शहरात रविवारी उसंत घेतली होती. शनिवारी रात्रीपासून जोरदार सरी शहरात कोसळत होत्या. मध्यरात्री पर्यंत पावासाचा जोर होता. मात्र, रविवारी सकाळपासून अधूनमधून कोसळलेल्या हलक्या सरी वगळता दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. जिल्ह्यात काही तालुक्यात उघडझाप तर काही तालुक्यात मध्यम सरी कोसळल्या. गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यासह राधानगरी, साळवण या गावांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सरासरी 19.8 तर शहरात 20 मि.मी. पाऊस झाला.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. गेल्या 24 तासांत 17 धरण प्रकल्पांत 1,672 मि.मी. पाऊस झाला. यामध्ये राधानगरी, तुळशी, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी, कोदे या 15 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली.
पंचगंगेच्या पाणी पातळीत तासागणिक वाढ होत आहे. रविवारी सकाळी सात वाजता पातळी 32 फूट 10 इंचावर होती. रात्री 9 वाजेपर्यंत यामध्ये 2.1 फुटांची वाढ होऊन पातळी 34 फुट 11 इंचावर होती. पंचगंगेचे पाणी गंगावेश ते शिवाजी पुलाकडे जाणार्या रस्त्याजवळ आले आहे.
जिल्ह्यातील 64 बंधारे पाण्याखाली गेल्याने सुमारे 120 गावांचा थेट संपर्क तुटला असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. याशिवाय दोन राज्य मार्ग व सहा जिल्हा मार्गावर पाणी आले आहे. सात मार्गावरील एसटी सेवेला पाण्यामुळे फटका बसला आहे. कोल्हापूर - राजापूर (अनुस्कुरा मार्गे बाजारभोगाव पुलावर पाणी आल्याने), गडहिंग्लज - कोवाडे (आयनापूर बंधार्यावर पाणी),चंदगड - भोगोली, पिळणी, बोवाची वाडी (रस्त्यावर पाणी आल्याने), राधानगरी - पडळी (पडळी पुलावर पाणी), गारगोटी - गारीवडे (बोटे पुलावर पाणी) मार्गावरील एसटी सेवा बंद आहे.
ग्रामीण भागात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे घरांची व जनावरांच्या गोठ्यांची पडझड सुरू आहे. गेल्या 24 तासांत 15 घरांची व 5 गोठ्यांची पडझड झाल्याने सहा लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.
शहरात सोसाट्याचा वारा सुटला होता. पाऊस आणि वार्यामुळे किमान तापमानात घट झाल्याने सायंकाळनंतर शहरात गारठा जाणवत होता. कमाल तापमान 23.8 अंशांवर तर किमान तापमान 20.9 अशांवर होते.
शिरोळ : धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरवाड, शिरोळ, राजापूर, कनवाड-म्हैशाळ, दत्तवाड-मलिकवाड, दत्तवाड-एकसंबा आणि कोथळी-समडोळी ही सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या बंधार्यांवरून जाणार्या मार्गांवरील वाहनचालकांची व स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा परिणाम झाला आहे.