जोरदार पावसाने खरिपावर संकट  
कोल्हापूर

Kolhapur : जिल्ह्यात पाऊस भरपूर; शेतकरी चिंतातूर

शिवारात पाणी, पेरण्या खोळंबल्या; जोरदार पावसाने खरिपावर संकट

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर/वाशी : गुरुवारी झालेला धुवाँधार पाऊस आणि त्यानंतर पुन्हा सुरू झालेली संततधार यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शिवारात पाणी असल्याने अनेक ठिकाणी नांगरटीची कामे खोळंबली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या ठप्प आहेत. काही ठिकाणी तर पेरलेले बियाणे वाहून गेल्याने खरिपावर संकट आले आहे. यामुळे जिल्ह्यात पाऊस भरपूर आणि शेतकरी चिंतातूर, असेच चित्र आहे.

यंदा मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसला. यामुळे पेरण्यासाठी जमीन तयार करण्यास शेतकर्‍यांना वेळच मिळाला नाही. जोरदार पावसाने मान्सूनचे आगमन होईपर्यंत जमिनी ओल्याच राहिल्या. मशागत नाही, जमिनीला घात नाही. यामुळे अनेक ठिकाणी पेरण्यांच्या अद्याप पत्ताच नाही; मात्र काही दिवस पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शेतकर्‍यांनी जशी घात येईल तशा पेरण्या केल्या; मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने त्यावरही काही ठिकाणी पाणी फिरवले आहे. पेरलेले बियाणे जोरदार पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शिरोळ, करवीर, हातकणंगले, गगनबावडा, पन्हाळा, भुदरगड आणि शाहूवाडी तालुक्यातील काही भागात उगवन झालेले भात, सोयाबीन आणि काही ठिकाणी ऊस पीक पाण्यात बुडाले आहे. पाण्याचा निचरा वेळेत न झाल्याने पिकांना फटका बसत आहे. कोणी पदरमोड करत तर कोणी हात उसने, उदारीवर बी-बियाणे, खते, औषधे घेतली आहेत; मात्र पावसाने ती वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वेळेवर पेरणी न झाल्याने त्याचा परिणाम खरिपावर होणारआहे.

जिल्ह्यात काही अंशी पेरण्या झाल्यानंतर चार दिवस झालेल्या पावसाने शिवार तुंबले आहे. बियांना अंकुर आलले व पेरणी केलेले बी वाहून गेले आहे. आता पुन्हा बियाणे खरेदी करण्याची परिस्थिती शेतकर्‍यांची नाही. खरिपाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. वेळेवर पेरणी झाली नसल्याने त्याचा परिणाम खरीप पिकावर होणार आहे. जिल्ह्यात शेकडो एकर शेतामध्ये नांगरणीची कामे पूर्ण झालेली नाहीत. पावसामुळे शेतात चिखल झाला असून ट्रॅक्टर आणि अन्य शेती मशागतीचे उपकरणे चालविता येत नाहीत.

सोयाबीन, भुईमुगाची पाण्यातच पेरणी

दरम्यान, साचलेल्या पाण्यातच पेरणी करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीसद़ृश पावसामुळे शेतातील सर्‍या पाण्याने तुडुंब भरून राहिल्या. काहींनी पाण्यातच सोयाबीन, भुईमुगाची पेरणी सुरू केली आहे.

शेतमजूर महिला आल्या मेटाकुटीला

पावसाने अनेक शेतात चिखल झाला आहे. साचलेले पाणी आणि चिखल यामुळे तीन पहारीने पेरणी करावी लागत आहे. यामुळे शेतमजूर महिला अशा पद्धतीने पेरणी करताना मेटाकुटीला आल्या आहेत.

नांगरणीची कामेही अपूर्णच

जिल्ह्यात शेकडो एकर शेतामध्ये नांगरणीची कामे पूर्ण झालेली नाहीत. पावसामुळे शेतात चिखल झाला असून ट्रॅक्टर आणि अन्य शेती मशागतीचे उपकरणे चालविता येत नाहीत, अशीच परिस्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT