Heavy rain in Kolhapur district on Sunday
१) खोची : दूधगाव बंधार्‍याजवळ वारणा नदीचे पात्र विस्तारले आहे. २) निलेवाडी : येथील पुलावर आलेले पाणी.  Pudhari News Network
कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्ह्यात धुवाँधार; जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. इचलकरंजीतील जुना पूल पाण्याखाली गेला असून मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू असली, तरी आणखी पाणी वाढल्यास हुपरी मार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे. निलेवाडी-ऐतवडे पुलावर पाणी आले असून जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाल्याने पोलिस व महसूल विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

इचलकरंजीत पंचगंगेची पातळी 62 फुटांवर

इचलकरंजी : इचलकरंजी शहर व परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी पाणी पातळी 62 फुटांवर पाहोचली आहे. जुन्या पुलावरही पाणी आले. त्यामुळे मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू असली, तरी आणखी पाणी वाढल्यास हुपरी मार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे.

शहरातील लक्ष्मी मंदिराच्या मागील बाजूस पाणी आले आहे. पाण्याच्या पातळीत एक फुटाने वाढ झाल्यास तीरावरील स्मशानभूमी पाण्याखाली जाणार आहे. वरदविनायक मंदिरातही मोठ्या प्रमाणात पाणी पसरले. शेळके मळ्यातून जॅकवेलमार्गे मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. मोठ्या पुलावर पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच या पुलावरील वाहतुकीचा ताण वाढल्याने वाहतूक कोंडी होत आहे. दिवसभरात दोन फुटांनी पाणी पातळी वाढली. पंचगंगा नदी तिरावर असलेल्या श्री वरदविनायक मंदिरात पाण्यातून वाट काढत भाविक दर्शनासाठी जात होते. पाणी पातळीत वाढ होऊन ते नागरी वस्तीत शिरण्याचा धोका असल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. नागरिकांच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पूरस्थितीची माहिती घेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

कर्नाटक मार्ग बंद होण्याची शक्यता

इचलकरंजीतून कर्नाटककडे जाणार्‍या नदीवेस मार्गावर यशोदा पुलाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी पुलाच्या बाजूने पर्यायी मार्गांद्वारे वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पर्यायी मार्गांच्या परिसरात पाणी पसरले आहे. दोन ते तीन फूट पाणी वाढल्यास पर्यायी मार्ग बंद होऊन कर्नाटककडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

थोरात चौकात वृक्ष उन्मळून पडला

मुक्त सैनिक वसाहतीच्या परिसरातील थोरात चौकात असणारे झाड पावसामुळे उन्मळून पडले. थोरात चौक येथे एका खासगी कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे थोरात चौकातील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. त्यातच रस्त्यावर झाड पडल्याने काही अंतरावरच दुसर्‍या बाजूची वाहतूकही बंद होती. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली. परिणामी, काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती.

पाटपन्हाळा शाळेमागे पठारावरील दगड घसरला

अर्जुनवाडा : दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्यामुळे शेती पिकामध्ये ओढ्यांचे पाणी शिरले आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पाटपन्हाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमागे इदरगंज पठारावरील मोठमोठी दगडे घरंगळून खाली आली आहेत. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसले, तरी पावसाचा जोर वाढला, तर दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फेजिवडेपैकी हत्ती महाल येथील दत्तात्रय कृष्णा गुरव यांच्या घराची भिंत पडून 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. राधानगरी व काळम्मावाडी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

गडहिंग्लजला दोन बंधारे पाण्याखालीच

गडहिंग्लज : तालुक्यात रविवारी पावसाचा जोर ओसरला; मात्र दिवसभरात अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या. हिरण्यकेशी नदीवरील जरळी बंधारा सकाळी खुला झाला. त्यामुळे पूर्व भागातील गावांचा थेट संपर्क सुरू झाला आहे. तीन दिवसांपासून निलजी व ऐनापूर हे दोन बंधारे पाण्याखालीच आहेत. त्यानंतर शनिवारी भडगाव पुलासह हरळी व जरळी हे दोन बंधारेही पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता; मात्र चार तासांनी भडगाव पूल खुला झाला. पश्चिम घाटासह आजरा तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी संथ गतीने कमी होत आहे. दरम्यान, घटप्रभा नदीवरील कानडेवाडी बंधार्‍यावरील पाणीपातळी कमी झाली असून, सोमवारी मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

खोची परिसरात पावसाची संततधार

खोची : पावसाची संततधार सुरू असली तरीही वारणा नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ होत आहे. मागील 24 तासांत खोची परिसरात वारणा नदीच्या पाणी पातळीत साधारण दोन ते तीन फूट वाढ झाली आहे. नदीकाठच्या भागातील पिके पाण्याखाली आली आहेत. सलग पाचव्या दिवशी खोची-दूधगाव बंधारा पाण्याखाली राहिला आहे.

वारणा नदीचे पाणी महापुराच्या दिशेकडे वाहू लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी, शेतकर्‍यांनी त्या द़ृष्टीने आपली तयारी सुरू केली आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्‍यांना चिंता सतावू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने पूररेषेतील पूरग्रस्तांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर पाणी पातळीत वाढ झाल्यास स्थलांतराबाबत आदेश देण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. खोची गावच्या तिन्ही बाजूला नदीचा प्रवाह असल्यामुळे पुराचा धोका जास्त जाणवतो. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

निलेवाडी-ऐतवडे पुलावर पाणी

कासारवाडी : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना जोडणार्‍या वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावर रविवारी पाणी आल्याने प्रशासनाने पुलावर बॅरिकेडस् लावून पूल वाहतुकीसाठी बंद केला. गत दोन दिवस चांदोली-वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर आल्याने निलेवाडी गावाशेजारील वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावर सायंकाळी 7 च्या सुमारास पाणी आले. यामुळे प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला.

दरम्यान, पोलिस व महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आहे. तहसीलदार कल्पना ढवळे, परीक्षाधीन तहसीलदार महेश खिलारे, पोलिस निरीक्षक विलास भोसले, मंडल अधिकारी अमित लाड, तलाठी शैलेश कुईंगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष भापकर यांनी पुराची पाहणी करून नागरिकांना हलवण्यासाठी विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूलमध्ये व जनावरांची सोय वारणा दूध संघाच्या पोल्ट्री शेडमध्ये केली. रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे निलेवाडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिरोली-सांगली फाटा येथे पाणी रस्त्यावर

शिरोली पुलाची : शिरोली एमआयडीसी, सांगलीकडे जाणार्‍या सेवा रस्त्यावर पाणी निर्गतीचा उपाय नसल्याने दोन-तीन फूट पाणी साचले आहे. या मार्गावरून वाहन चालवताना वाहनधारकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने कसरत करावी लागत आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणांतर्गत सांगली फाटा येथे पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून सांगली व एमआयडीसी शिरोलीकडे वळविली आहे.

सध्या धनवर्षा हॉटेल समोरील ड्रेनेज जामच आहे. त्यातून पाणी रस्त्यावर वाहून पुढे सांगली फाटा येथे पुलाजवळ येते. त्या ठिकाणी पाणी साठून त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या या महामार्गाच्या बाजूचे सेवा रस्त्यावरील ड्रेनेज काम अपूर्ण आहे. त्यामुळे हे पाणी काढण्याचा रविवारी प्रयत्न झाला; परंतु त्यास यश आलेले नाही. संबंधित ठेकेदाराला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी जाब विचारून वरचेवर पाणी साठणारा हा शिरोली सांगली फाटा रस्ता कायम खुला राहावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

घुणकी ओढ्याच्या पुलावर अपघात; वाहतूक ठप्प

किणी : पुणे-बेंगलोर महामार्गावरील घुणकी ओढ्याच्या पुलावर रविवारी रात्री सात वाजता दुभाजकाला धडकून ट्रकचा अपघात झाल्याने भरपावसात दोन तास वाहतूक ठप्प झाली. महामार्गावर घुणकीजवळच्या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच पुलावरून वळविण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी पुण्याकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकने दुभाजकाला धडक दिल्याने अपघात झाला. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड, हवालदार चंद्रशेखर लंबे, आयुब शेख, आकाश पाटील आदींसह महामार्ग मदत पथकाचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त होते.

SCROLL FOR NEXT