कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहर आणि परिसराला सोमवारी रात्री वळवाने तडाखा दिला. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर कोसळणार्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली. पावसाने शहरातील बहुतांश वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे.
सोमवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. सायंकाळी वातावरण अधिकच ढगाळ झाले. जोरदार वाराही सुटला.
रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांसह व्यापारी, विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. जागा मिळेल तिथे अनेकांनी अडोसा घेतला. काहींनी भर पावसातच भिजत जाणे पसंत केले. पाऊस सुरू झाल्यानंतर व्यापारी, हातगाडीवरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. भाजी मंडईतही विक्रेत्यांचे पावसाने हाल झाले. पावसाच्या शक्यतेने काहींजण घरातून छत्र्या, रेनकोट घेऊनच बाहेर पडले होते.
पावसाने शहराच्या काही भागात रस्त्यावर पाणी साचले. पाऊस, साचलेले पाणी आणि रस्त्यावर अंधार अशा परिस्थितीत ये-जा करणार्या पादचार्यांचे चांगलेच हाल झाले. परिख पुलाखालीही पाणी साचले होते, त्यातूनच मार्ग काढत धोकादायक पद्धतीने पादचार्यांची ये-जा सुरू होती. रंकाळा चौपाटीसह फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांची त्रेधातीरपीट उडाली. जोरदार वारा आणि त्यानंतर आलेल्या पावसाने रंकाळ्यातील नौकानयन थांबविण्यात आले. पर्यटकांसह अंबाबाई मंदिरात आलेल्या भाविकांनाही पावसाचा फटका बसला.
सोमवारी शहरात सरासरीपेक्षा दोन अंशांनी पारा घसरला. दिवसभरात 34.1 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. 24.1 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा दोन अंशांनी किमान तापमान जादा होते, यामुळे हवेत दिवसभर उष्मा होता. पाऊस झाल्यानंतर हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल, आजरा, खोची, राशिवडे आदी भागालाही वळिवाने तडाखा दिला. पावसाने वीट भट्टीचे काहीसे नुकसान झाले.