कोल्हापूर : शहराला वादळी वार्यासह धुवाँधार पावसाने बुधवारी अक्षरशः झोडपून काढले. दुपारी तीनच्या सुमारास अचानक सायंकाळसारखा अंधार झाला आणि सोसाट्याचा वारा सुटला. काही क्षणातच मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव सुरू झाला आणि शहराची दाणादाण उडाली. वादळी वार्यामुळे शहरात 25 ठिकाणी झाडे कोसळली. यामुळे अनेक मोटारींचे नुकसान झाले आहे. सुमारे तासभर झालेल्या कोसळधारांमुळे शहराच्या सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. परिणामी शहरात जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.
मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा शहराला बसला. शहरासह जिल्ह्यातही धुवाँधार पाऊस झाला. पावसासोबतच वादळी वार्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली. सिद्धाळा गार्डन येथे झाड पडल्याने दुचाकीसह मोटारींचे नुकसान झाले. टिंबर मार्केट परिसरात एक मांडव कोसळला. अनेक ठिकाणी छोट्या टपर्यांचे प्लास्टिक, डिजिटल बोर्ड उडून गेले. रस्त्यावर लावण्यात आलेले दिशादर्शक फलक देखील पडले होते. शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जयंती नाला ओसंडून वाहत होता. परिणामी काळेकुट्ट फेसाळलेले पाणी थेट पंचगंगेत मिसळत होते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बुधवारी दुपारी चारनंतर अवकाळी पावसाने झोडपून काढले. वाशी परिसरात गारपीट झाली. पन्हाळगडावर झाडे उन्मळून पडली, तर आसुर्लेत एकाच शेडचे पत्रे उडून गेले. या पावसाने अनेक ठिकाणी झाडे, फांद्या तुटून पडल्या. काही गावातील मुख्य तारांवर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या पावसाने काही पिकांचे नुकसान तर काही पिकांना हा पाऊस लाभदायक ठरला.
पन्हाळ्यावर वादळी वार्यासह पावसाची हजेरी
पन्हाळा : पन्हाळगडवासीयांना बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसाने दिलासा दिला. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे व फांद्या पडल्या असून, एका तासात 22 मि.मी. पावसाची नोंद झाली.
वादळी वार्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे व फांद्या वीज तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. गडावरील मोठे आंब्याचे झाड उन्मळून पडले असून फांद्या पडल्यामुळे काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.
मलकापुरातही हजेरी
मलकापूर : येळवण जुगाई, करूंगळे येथील ग्रामदैवताच्या यात्रेत येणारे भाविक व विक्रेत्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. पाऊण तास बिगरमोसमी पावसाच्या सरी मलकापूरसह शाहूवाडी तालुक्यात बरसत होत्या. पावसाने आंबा, काजूची फळे पडून नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत प्रमुख गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. सरूड, बांबवडे, आंबा, येळवण जुगाई, शाहूवाडी, शित्तूर वारूळ आदी परिसरात पाऊस पडला. मलकापूर व बांबवडे बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
पिकांना दिलासा
यवलूज : बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह आलेल्या पावसाने यवलूज - पडळ परिसरात हजेरी लावली. माळरानावरील पिकांना जीवदान मिळाले. जोरदार वादळी वार्यासह आलेल्या पावसाने वीज गायब झाली. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली.
बानगे परिसरात जोरदार पाऊस
बानगे : बानगे परिसरात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. परिसरात एका महिन्यात तीन वेळा पाऊस झाला असल्याने ऐन उन्हाळ्यात सुकलेली पीके तरतरीत झाले आहेत.
गारपीट पावसाने झोडपले
वाशी : शेळकेवाडी,नंदवाळ, पिरवाडी,वाशी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वार्यांसह मेघगर्जना करत गारपीट पावसाने वाशी परिसराला झोडपले आहे. पावणे चारच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसासह गाराही पडल्याने सर्वत्र वातावरणात गारावा निर्माण झाला होता. यावेळी लहान मुले गारा वेचत रस्त्यावर नाचत पहिल्या पावसाचा आनंद घेत होती. पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.यामुळे दैनंदिन कामात अडथळा निर्माण होऊन घरगुती व व्यावसायिक कामांवर परिणाम झाला.
आसुर्ले पोर्ले परीसराला अवकाळीचा दणका
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले परिसरात दुपारी चारनंतर अवकाळी पाऊस जोराचा झाला. सोसाट्याच्या वार्यामुळे झाडे मोडून पडली. पोर्ले येथे मुख्य विद्युत तारावर झाड पडल्यामुळे खांब वाकला. आसुर्ले येथे सदाशिव रंगराव पाटील यांचे शेड उडुन दुसर्या घरावर पडले. वार्याचा व पावसाचा जोर इतका होता की अनेक घरांची कौले व पत्रे उडाले. घरातील धान्य व प्रांपचीक साहित्य भिजुन नुकसान झाले. बर्याच ठिकाणी झाडे पडून विद्युत खांब वाकले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या पावसामुळे विट भट्टी चालकांची तारांबळ उडाली. हाता तोंडाशी आलेल्या मका पिकाचे नुकसान झाले आहे.
फुलेवाडी येथे झाडे कोसळली
फुलेवाडी : बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वार्यामुळे फुलेवाडी चौथा बस थांबा येथील दोन झाडे कोसळली. झाडाच्या फांद्या खांबावर पडल्यामुळे तारा तुटून परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
चिमणे येथे वीज पडून नुकसान
उत्तूर : चिमणे ता. आजरा येथे सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वार्यासह झालेल्या पावसावेळी कर्मवीर विद्यालयावर पडलेल्या विजेमुळे सीसीटीव्ही मशिन, केबल व कॅमेरा जळाला. यात अंदाजे वीस ते पंचवीस हजारांचे नुकसान झाले. दरम्यान शाळा सकाळच्या सत्रात सुरू आहे. विजेच्या आवाजाने परीसरातील लोक भयभीत झाले होते.
भाविकांसह नागरिकांची तारांबळ
सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या जोरदार सरींमुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जोतिबा यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक शहरात आले होते. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची अचानक आलेल्या पावसामुळे हाल झाले. जिथे जागा मिळेल तिथे आडोसा शोधावा लागला. काही दुचाकीस्वार रेनकोट, छत्री घेऊन फिरताना दिसत होते.
तासाभरातच शहर तुंबले; परिख पुलाला तळ्याचे स्वरूप
अवघ्या तासाभरात जोरदार पाऊस झाल्याने शहरातील सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी तर अक्षरशः गुडघाभर पाणी साचले होते. बाबूभाई परिख पूल, जयंती नाला, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड, दसरा चौक, पद्मा टॉकीज, रेल्वे स्टेशन परिसरातील भागांना तळ्याचे स्वरूप आले होते. रस्ते जलमय झाल्याने वाट काढताना दुचाकीस्वारांना कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती.
या ठिकाणी कोसळली झाडे
शहरात जाधववाडी, जवाहरनगर, जुना वाशी नाका, हडको कॉलनी, साळोखेनगर, निकम पार्क, राजलक्ष्मीनगर, शास्त्रीनगर, देवकर पाणंद, रामानंदनगर, जरगनगर, उद्यमनगर, जवाहर नगर, सासने कॉलनी, सुभाष रोड येथे झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.