kolhapur | शहरात रिपरिप; सहा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी File Photo
कोल्हापूर

kolhapur | शहरात रिपरिप; सहा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

‘राधानगरी’चे दोन दरवाजे पुन्हा खुले; जिल्ह्यातील ४५ बंधारे अद्याप पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात रिपरिप सुरू असली, तरी धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस कायम आहे. गेल्या २४ तासांत गगनबावडा गावासह सहा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरणाच्या ३ व ६ नंबरच्या स्वयंचलित दरवाज्यांतून ४,२५६ क्युसेक विसर्ग पुन्हा सुरू झाला आहे. परिणामी, मंगळवारपासून घटत असलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत बुधवारी दुपारी ३ वाजल्यापासून वाढ सुरू झाली. रात्री ९ वाजता पंचगंगेची पातळी ३० फूट ९ इंचांवर होती. जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

शहरात बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. तर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११.२ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ५७.३ मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. तर कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा, जांबरे, कोदे या सहा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी मंगळवारी रात्री १२ वाजता ३० फूट ११ इंचांवर होती. बुधवारी दुपारी दोनपर्यंत पातळी ३० फूट ६ इंचांपर्यंत घटली होती. यानंतर पातळीत वाढ सुरू झाली. जिल्ह्यातील २१ खासगी मालमत्तांचे ५ लाख ९६ हजार रुपयांचे नुकसान झाले.

‘राधानगरी’चे दोन दरवाजे खुले

मंगळवारी रात्री ११.५७ वा राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. ३ उघडले. बुधवारी मध्यरात्री १२.४२ वा. धरणाचे ६ नंबरचा दरवाजा उघडला. दोन स्वयंचलित दरवाज्यांतून व पॉवर हाऊसमधून एकूण ४,२५६ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरू आहे.

‘वारणे’तून विसर्ग वाढवला

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याची वाढ होत असल्यामुळे रात्री ८ वाजता वक्र दरवाजाद्वारे ५,००० क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून ५,७०० क्युसेक व विद्युत गृहातून सुरू असलेला १,४०० क्युसेक विसर्ग मध्ये २०० क्युसेक वाढ करून १,६०० क्युसेक असा एकूण ७,३०० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. तसेच, तुळशी धरणाच्या सांडव्यावरून दुपारी ३ वाजता ५०० क्युसेकइतका विसर्ग सुरू झाला आहे.

दोन मार्गांवरील एसटी सेवा विस्कळीत

शिरढोण पुलावर पाणी आल्याने इचलकरंजी-कुरुंदवाड एसटी सेवा पर्यायी मार्गाने सुरू आहे. चंदगड ते हेरे, बुजवडे, कोनवाडी, भोगवली, पिळणी या मार्गांवरील एसटी सेवा बंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT