कोल्हापूर : पाणी पातळी कमी झाल्याने पंचगंगा नदी पात्रातील मंदिरे संपूर्ण खुली झाली होती. १२ दिवसांपूर्वीचे चित्र आता पूर्ण बदलले आहे. पाणी पातळी वाढली असून, नदी पात्रातील मंदिरांची शिखरे पाण्याखाली गेली आहेत.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Monsoon Update | गगनबावड्यात मुसळधार; ८ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोर धरला आहे. बुधवारी दुपारी शहरात धुवाँधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाच्या दमदार सरी बरसत आहेत. गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात १०८.८ मि.मी. पाऊस झाला. याशिवाय राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, सर्फनाला, कोदे या धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला रविवार (दि. ५) पर्यंत पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. शहरात ताराबाई पार्क येथील भविष्‍य निर्वाह निधी कार्यालयाच्‍या परिसरात मोठे झाड उन्‍मळून तीन मोटारींवर पडले. यात एक जखमी झाला. रात्री पावसाची रिपरिप कायम होती. राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी रात्री ११ वाजता १२ फुटांवर होती.

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथे झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. (छाया : मिलन मकानदार)

जिल्ह्यात दिवसभर पावसाची दमदार बॅटिंग

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शहरासह जिल्ह्यात बुधवारी दुपारी धुवाँधारा पाऊस झाला. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, सर्फनाला, कोदे या धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे.

दरम्यान, ताराबाई पार्क येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोरील झाड बुधवारी (दि. १) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळले. यामध्ये तीन मोटारींसह एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, पृथ्वीराज मंगेश लिंग्रस (वय २५, रा. राजारामपुरी) हा तरुण जखमी झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

शहरात बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून मध्यम सरी बरसत होत्या. सायंकाळी चारनंतर पावसाने जोर धरला होता. सखल भागात पाणीच पाणी झाले होते. ताराबाई पार्कातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या दारातील भलेमोठे झाड बुधवारी सायंकाळी कोसळले. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन चार चाकी, एक दुचाकी व रस्त्यावरून जाणारी एक मोटार झाडाखाली सापडली. यामुळे वाहनांच्या सर्व काचा फुटून मोठे नुकसान झाले. झाड कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास पाचारण केले. सासने मैदान येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, चालक नवनाथ साबळे, फायरमन संभाजी ढेपले, महेश पाटील यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर वृक्ष तोडून वाहतूक सुरळीत केली. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती. तसेच, विद्युत पुरवठाही काही काळ खंडित केला होता. सुमारे अर्धा तास वाहने झाडाखाली अडकून होती.

‘या’ गावांत बरसला जोरदार

शहरात गेल्या २४ तासांत ९.७ मि.मी. पाऊस झाला, तर जिल्ह्यातील १२ तालुक्यांत सरासरी १६ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये राधानगरी तालुक्यात राधानगरी, सरवडे, क. तरळे, आवळी बु, क. वाळवे, भुदरगड तालुक्यात गारगोटी, कूर, कराडवाडी, कागल तालुक्यात बिद्री, करवीर तालुक्यात बीड, पन्हाळा तालुक्यात कोतोली, चंदगडमध्ये नारंगवाडी, हेरे तर आजरा तालुक्यातील मलिग्रे येथे २० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

केवळ दैव बलवत्तर म्हणून...

राजारामपुरी येथील पृथ्वीराज लिंग्रस हे मोटारीतून किरण बंगल्याकडून धैर्यप्रसाद हॉलकडे निघाले होते. याचवेळी त्यांच्या मोटारीवर झाड पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि हाताला ईजा झाली. काही सेकंद पुढे असते, तर झाड थेट मोटारीच्या टपावर कोसळून गंभीर दुखापत झाली असती. नागरिकांनी मदत करत लिंग्रस यांच्यासह सहकाऱ्यांना मोटारीतून बाहेर काढले व उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT