कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास कोसळधारा सुरू होत्या. ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली.
या पावसामुळे दुचाकीस्वारांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सखल भागांत पाणी साचले होते. राजारामपुरी, रमणमळा, शाहूपुरी परिसरात झाडे कोसळली. शहर परिसरालाही या पावसाने झोडपले. तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाचा हलका शिडकावा होत आहे. शनिवारी सकाळपासूनच आकाश ढगांनी व्यापले होते. सायंकाळी नभ दाटून आले व जोरदार सरी कोसळू लागल्या. पावसाची तीव्रता इतकी होती की, समोरचे काही दिसत नव्हते. अर्धा तास कोसळल्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. यानंतर पुन्हा ८ च्या सुमारास शहरात सरी बरसू लागल्या. पावसाचा जोर वाढताच अनेक दुचाकीस्वारांनी आडोसा शोधला.
जिल्ह्याच्या विविध भागांत हजेरी
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १५.४ मिलिमीटर पावसाची नोंद राधानगरी तालुक्यात झाली. गगनबावडा, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतही पाऊस झाला. जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला आहे.