कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अवसायनातील १९३ दूध संस्थांबाबत सुरू असलेली सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला. दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुमारे दीड तास युक्तिवाद केला. सुनावणीच्या निकालाकडे आता दूध संस्थांचे लक्ष असणार आहे.
सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी अवसायनात काढलेल्या ६४४ दूध संस्थांपैकी १९३ दूध संस्थांनी ठाकरे यांच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली. दूध संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी व बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. आज अथवा शुक्रवारी (दि. ७) निकाल मिळण्याची शक्यता आहे.
‘त्या’ ४१० दूध संस्थांची सोमवारी सुनावणी
महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी ‘गोकुळ’ने ४१० दूध संस्थांना चुकीच्या पद्धतीने सभासदत्त्व दिल्याने त्यांचे सभासदत्त्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सहकार न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी (दि. १०) ठेवली आहे.
‘गोकुळ’ निवडणूक मुदतवाढ; सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणूक प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्यासाठी राज्य सरकारच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (दि. १०) सुनावणी होत आहे. न्यायालयाने निवडणुकीसाठी दिलेली ९० दिवसांची मुदत आज (दि. ६) संपत आहे. मुदतीत निवडणूक न झाल्याने हसूर (ता. करवीर) येथील कै. राऊ सखाराम पाटील दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. तर वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेने ‘गोकुळ’संदर्भात सुरू असलेल्या सर्व सुनावण्या पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या, अशी याचिका दाखल केली आहे. यासर्व याचिकांवर सोमवारी एकत्रित सुनावणी होण्याची शक्यात आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने मुदतवाढीसाठी यापूर्वीच अर्ज केला आहे. तर शासनाने संगनमताने ‘गोकुळ’ची निवडणूक लांबवली असल्याचा आरोप करत हसूर येथील दूध संस्थेने निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त अनिल कवडे, सचिव अशोक गाडे, तत्कालीन विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील, सध्याचे देवीदास मिसाळ, सहनिबंधक कृष्णा ठाकरे यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ दूध संस्थेबाबत सहकार, कोल्हापूर सर्किट बेंच, सर्वोच्च न्यायालय, सहनिबंधक मुंबई, विभागीय उपनिबंधक पुणे, सहायक निबंधक कोल्हापूर येथे सुनावणी सुरू आहे. येथील सुनावणी पूर्ण झाल्यावरच निवडणूक घ्या, अशी याचिका दाखल केली आहे. यासर्व याचिकांवर न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष असणार आहे.
अधिकार्यांवर कारवाईची मागणी
हसूरच्या दूध संस्थेने मुदतीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश असूनही अद्याप प्रक्रियाच सुरू न करणार्या संबंधित अधिकार्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली आहे.