कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न 1,108 दूध संस्थांबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये मंगळवारी (दि. 17) महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये मंत्री मुश्रीफ यांनी मांडलेले मुद्दे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणार्या सुनावणीत विचारात घ्यावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांचे वकील अॅड. आनंद लांडगे यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
‘गोकुळ’च्या 1,108 दूध संस्थांबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात मंत्री मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंत्री मुश्रीफ यांच्या याचिकेवर बुधवारी (दि. 11) सुनावणी झाली. सुनावणीमध्ये न्यायालयाने मंत्री मुश्रीफ यांनी याचिकेत ज्या संस्था अवसायनात निघालेल्या आहेत, त्यांना या प्रकरणात प्रतिवादी केलेले नाही. त्यांना प्रतिवादी करून न्याय मागण्याची संधी मिळाली पाहिजे.
निवडणूक प्राधिकरणालाही प्रतिवादी केलेले नाही. अनेक संस्थांनी एक महिन्याच्या आत आपली संपूर्ण माहिती सहायक निबंधक (दुग्ध) यांना दिलेली आहे. त्याचा निकाल मेरिटवर लावण्यात यावा आणि निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्यात यावा, असे मुद्दे मांडले होते. हे मुद्दे कोल्हापूर सर्किट बेंचमधील मंगळवारच्या सुनावणीत विचारात घेण्यात यावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचमधील पुढील सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.