कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरात अतिक्रमण केलेल्यांना महापालिकेने शनिवारी (दि. 9) पोस्टाने नोटिसा बजावल्या. तसेच कर्मचार्यांनी समक्ष जाऊन संबंधित मिळकतींवर नोटिसा चिकटविल्या. 204 मिळकतधारकांची 26 मे रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यानंतर आदेश पारीत करून साहित्य काढण्यासाठी पुन्हा 15 दिवसांची मुदत दिली जाणार आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांनी दिली.
तावडे हॉटेल परिसरातील उचगाव ग्रामपंचायतीने दावा केलेली जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 22 एप्रिल रोजी दिला. त्यानंतर महापालिकेने या जागेवरील बेकायदेशीर बांधकामांचा 24 व 25 एप्रिल रोजी सर्व्हे केला. येथे महापालिकेची 158 एकर जागा आहे. ट्रक टर्मिनससाठी 23.5 एकर जागा आरक्षित आहे. कचरा डेपोसाठी 11 एकर जागेवर आरक्षण आहे. उर्वरित जागेवर नो डेव्हलपमेंट झोन आहे, तरीही तेथे तब्बल 204 बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली आहेत.
संबंधित बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. काही अतिक्रमणधारकांनी सर्किट बेंचमध्ये त्या नोटीसांना आव्हान दिले होते. 7 मे रोजी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेची कार्यवाही सुरू आहे. 26 मे रोजी दोन अतिरिक्त आयुक्त संबंधित अतिक्रमणधारकांची सुनावणी घेणार आहेत. त्यासाठी कागदपत्रांसह हजर राहण्याची सूचना नोटीसीत केली आहे.