कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयानंतर कोल्हापुरात आरोग्यसेवेचा विस्तार होणार आहे. कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात 100 खाटांसह जिल्हा रुग्णालय 100 खाटांचे, तसेच 100 खाटांचे महिला रुग्णालय आणि 50 खाटांचे क्रिटिकल केअर युनिट यासह कॅथलॅब उभारली जाणार आहे. कोल्हापूरकरांसाठी आरोग्याचे नवे दालन सुरू होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत सांगितले. सेवा रुग्णालयाच्या विस्तारासाठी अडथळा ठरणार्या कचरा प्रकल्पाचा बफर झोन 500 मीटरवरून 200 मीटर इतका करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
आबिटकर म्हणाले, सेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी महापालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या बफर झोनबाबत तोडगा काढण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत यापूर्वी बैठक घेण्यात आली होती. आता ‘एमपीसीबी’कडून बफर झोनच्या शिथिलथेबाबतचे पत्र दिले आहे. महापालिकेने 200 मीटरची रेषा अंतिम करावी. आर्किटेक्चर यांनी क्रिटिकल केअर सेंटर, वूमन्स हॉस्पिटल आणि कॅथलॅबकरिता डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी. बफर झोनची सीमा निश्चित करण्यासाठी पथक नेमा, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
सेवा रुग्णालयावर कसबा बावडा, शिये आदी भागातील सुमारे 1 लाख नागरिक अवलंबून आहेत. यामुळे रुग्णालय सुसज्ज व्हावे. दुर्मीळ आजारांच्या उपचारांसह मल्टिस्पेशालिटी दर्जा व सुविधा या ठिकाणी रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न असल्याचे आ. क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.