कोल्हापूर : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी चिरंतन जतन करून ठेवा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस येत आहे. त्यानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करा, असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, एस. आर. आय. मोहिमेंतर्गत मतदार यादी आमदारकी, खासदारकीची समजून गाफील राहू नका. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका, नगरपंचायती व महापालिका निवडणुकाही याच यादीवर होणार आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात भैया माने यांच्या रूपाने आपण अश्वमेधाचा घोडा सोडला आहे. जिल्ह्यात एक लाख मतनोंदणीमुळे नंबर एकवर आहोत. आणखी नोंदणीसाठी जिद्दीने काम करू. स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेतील विजेत्या जैन्याळ गावात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वच्छतेची कामे बघून समाधान व्यक्त केले होते.
यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राजेश पाटील, राहुल पी. एन. पाटील, केडीसीसीचे संचालक भैया माने, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, शहराध्यक्ष आदिल फरास, इचलकरंजीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, गोकुळचे संचालक किसन चौगुले, बाळासाहेब खाडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्टला विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सीपीआर हॉस्पिटलचे लोकार्पण, कागलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन ९ ऑगस्टला होणार आहे.