कोल्हापूर : महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास व शारंगधर देशमुख यांच्यात झालेल्या वादावादीच्या प्रकारावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव नाराजी व्यक्त केली. एकमेकांना धमकावणारी भाषा अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधितांना समज देणार आहे, तरीही ऐकले नाही, तर खासबाग मैदानात त्यांची कुस्ती लावू, असा इशाराच त्यांनी दिला.
जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमानिमित्त गुरुवारी कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात माझ्या पक्षाचा कार्यकर्ता सहभागी असल्याने मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व मी स्वतः एकत्र बसून संबंधितांना ताकीद देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नंदूरबारच्या पालकमंत्री पदाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन यापूर्वी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काही दिवसांतच नाकारले होते. आता परिस्थिती लक्षात घेऊन नंदूरबारची जबाबदारी स्वीकारली आहे. आदिवासी बहुल असलेल्या या जिल्ह्यासाठी नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत ही जबाबदारी पार पाडणार आहे.