Hasan Mushrif | अदृश्‍य शक्‍ती जागृत होणार नाही; जागावाटप ठराव संख्‍येनुसारच  
कोल्हापूर

Hasan Mushrif | अदृश्‍य शक्‍ती जागृत होणार नाही; जागावाटप ठराव संख्‍येनुसारच

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : गोकुळमध्‍ये पुन्‍हा अदृश्‍य शक्‍ती जागृत होणार नाही. निवडणुकीत जागा वाटप ठरावांच्‍या संख्‍याबळानुसारच होणार असल्‍याची स्‍पष्‍टोक्‍ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच महायुतीचे ७ ऑक्‍टोबरला उमेदवार निश्‍चित होतील आणि ८ ऑक्‍टोबरला पॅनेलची घोषणा होईल, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. भाजप कार्यालयातील गोंधळानंतर जागा वाटपात अदृश्‍य शक्‍ती पुन्‍हा जागृत झाली आहे का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्‍यानंतर त्‍याला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ बोलत होते.

मंत्री मुश्रीफ यांनी, लोकशाहीत मतभेद होतात, मनभेद नाही, असे सांगत भाजप कार्यालयात ठरावांची चाचपणी करताना थोडा गोंधळ झाला. पण आम्‍ही एकत्र बसून यावर तोडगा काढला आहे. जागावाटपात कोणाचाही दबाव नसून संख्‍याबळानुसारच जागा वाटप होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्‍पष्‍ट केले.

‘गोकुळ’मध्‍ये विरोधकांची अनामत रक्‍कम जप्‍त होईल

कोल्‍हापूर : गोकुळ दूध संघाच्‍या निवडणुकीत महायुतीचा पराभव नव्‍हे, तर विरोधकांच्‍या उमेदवारांची अनामत जप्‍त होतील. त्‍यामुळेच नैराश्‍यातून ते महायुतीच्‍या पराभवाची भाषा करीत आहेत, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला.

खा. महाडिक म्‍हणाले, महायुतीकडे ४ हजार ४०० ठराव आहेत. दूध उत्‍पादकांचा पाठिंबा आहे. त्‍यामुळे महायुतीचा पराभव होण्‍याचा प्रश्‍नच नाही. उलट विरोधी समविचारी आघाडीच्‍या उमेदवारांच्‍या अनामत रकमा जप्‍त होतील, या नैराश्‍येपोटी ते महायुतीचा पराभव होईल, असे वक्‍तव्‍य करीत आहेत. महायुतीत जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. सर्व घटक पक्षाचे नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. त्‍यानंतर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे हा प्रश्‍न मांडून मार्ग काढला जाणार आहे.

दुष्‍काळाबाबत बोलताना महाडिक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याशी जिल्‍ह्यातील उर्वरित तालुक्‍याबाबत चर्चा झाली आहे. त्‍याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्‍यासाठी सरकार पावले उचलत असून दोन दिवसांत शेतकर्‍यांच्‍या हाती मदत मिळेल, असे सांगितले. पत्रकार परिषदेस आमदार अमल महाडिक, महापौर रुपाराणी निकम, स्‍थायी समिती सभापती विशाल शिराळे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्ष तानाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव, जिल्‍हाध्‍यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT